सरकारकडून मदत जाहीर, पण अजून पोहोचलीच नाही? लॉकडाऊनच्या पॅकेजवर प्रश्नचिन्ह!

राज्यात 7 लाख 15 हजार रिक्षा परवानाधारक असून, त्यांना प्रत्येकी 1500 रुपयांप्रमाणे एकूण 107 कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यांवर थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याबाबत परिवहन मंत्र्यांनी सांगितले होते.

153

राज्यात वाढत्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाकरे सरकारला लॉकडाऊन लावण्याची इच्छा होती, परंतु यामुळे गोरगरीब आणि असंघटित कामगारांसाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणी भाजपने केली होती. त्यामुळे अखेर ठाकरे सरकारने फेरीवाले, रिक्षावाले यांच्यासह असंघटित कामगारांसाठी ५,४७६ कोटीचे पॅकेज जाहीर केले; परंतु लॉकडाऊन लावून १५ दिवस उलटले, तरी अद्याप ही मदत या घटकांपर्यंत पोहचली नाही, अशी धक्कादायक माहिती मिळत आहे.

मदत कुठून मिळणार? याविषयी अनभिज्ञ!

ठाकरे सरकारच्या पॅकेजच्या घोषणेमुळे रिक्षाचालक, फेरीवाले, घरेलू कामगार यांना १५०० रुपये आर्थिक मदत मिळणार होती.  त्या अनुषंगाने प्रत्येक लाभार्थ्याला 1500 रुपये मिळणे हे अपेक्षित होते. आज लॉकडाऊनचा कालावधी 15 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की, सरकारी वेबसाईटवर अथवा हेल्पलाईन सेंटरवर ही मदत कशी मिळवायची ही माहिती मिळत नाही. या संकेतस्थळावर ऑटो रिक्षा चालकांना त्यांचे फॉर्म देखील अजून अपलोड करता येत नाही, अजून 30 ते 35 दिवसांचा कालावधी हे फॉर्म अपलोड करण्यासाठी लागणार आहेत, असे भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष, संजय पांडे म्हणाले.

(हेही वाचा : पुण्यातील डॉक्टर व हॉस्पिटलेच ऑक्सिजनवर! डॉक्टर्स असोशिएशनचा आरोप).

…तर सरकारविरोधात नाराजी! 

त्यामुळे सरकारने लॉकडाऊन काळात गरिबांसाठी मदत जाहीर केली, पण अजून ती पोहचली नाही, त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात गरीब माणसे जगणार कशी? कोरोनामुळे तर हे समाजघटक वाचतील, पण उपासमारीमुळे हे वाचणार नाहीत हे निश्चितच आहे. त्यामुळे येणाऱ्या पाच दिवसांत तरी रिक्षा चालकांच्या मदतीसाठी वेबसाईटवर फॉर्म अपलोड करण्याची सुविधा सुरु करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्राला एका मोठ्या उद्रेकला सामोरे जावे लागेल, असा इशारा संजय पांडे यांनी दिला आहे.

राज्याची ऑनलाईन प्रक्रिया कधी सुरु होणार? 

राज्यात 7 लाख 15 हजार रिक्षा परवानाधारक असून, त्यांना प्रत्येकी 1500 रुपयांप्रमाणे एकूण 107 कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यांवर थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याबाबत परिवहन मंत्र्यांनी सांगितले होते. त्याकरता परिवहन विभागामार्फत ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येत असून, त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना आपले आधार क्रमांक, वाहन क्रमांक व अनुज्ञप्ती(रजिस्टर) क्रमांक याची ऑनलाइन नोंद करावी लागेल. खातरजमा झाल्यानंतर आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम ऑनलाइन पध्दतीने जमा करण्यात येणार आहे, असे सांगितले होते. पण ही ऑनलाईन प्रक्रिया अजून सुरूच झाली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.