अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त ठाणे शहरातील ६५ मंदिरांमध्ये दीपोत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांचे दहा दिवस आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर मंदिरे प्रभावी समाज केंद्रे करण्याबरोबरच मोठ्या मंदिरांकडून छोटी मंदिरे दत्तक घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
विश्व हिंदू परिषदेअंतर्गत, ‘मंदिर व अर्चक रोहित संपर्क आयाम’च्या वतीने ठाणे शहरातील मंदिर विश्वस्तांचे संमेलन जैन संघाच्या हॉलमध्ये पार पडले. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला, असे विश्व हिंदू परिषदेचे ठाणे जिल्हा संयोजक सचिन मालवीय व सचिन म्हस्के यांनी सांगितले. या संमेलनाला मंदिर व अर्चक पुरोहित संपर्क आयामचे मुंबई क्षेत्रप्रमुख अनिल सांबरे, प्रांत मंत्री मोहन साळेकर, ठाणे विभाग मंत्री मनोज शर्मा, कौपिनेश्वर मंदिर कमिटी ट्रस्टचे सचिव रवींद्र विश्वनाथ उतेकर, ठाणे वर्धमान स्थानकवासी जैन संघाचे विश्वस्त चिमणभाईगाला, संपर्क आयामचे कोकण प्रांतप्रमुख राजकुमार भारद्वाज, प्रांत टोळीच्या कोकण प्रांताचे सदस्य अॅड. राजेश मुधोळकर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष भरतभाई सचदेवा आदी उपस्थित होते.
(हेही वाचा – Transporters Strike: वाहतूकदारांच्या संपामुळे देशात इंधन तुटवडा, पेट्रोलपंपांवर झाली वाहनचालकांची प्रचंड गर्दी)
या संमेलनामध्ये ठाणे महानगरातील कौपिनेश्वर मंदिर ट्रस्ट, ठाणे वर्धमान स्थानकवासी जैन मंदिर ट्रस्ट, श्रीनगर येथील अय्यपा मंदिर ट्रस्ट, गजानन महाराज मंदिर ट्रस्ट, स्वामीनारायण मंदिर ट्रस्ट, टेंभीनाका येथील श्वेतांबर जैन मंदिर ट्रस्ट, नौपाडा येथील गावदेवी मंदिर ट्रस्ट, खिडकाळेश्वर मंदिर, मुंब्रेश्वर मंदिर ट्रस्ट आदी मंदिरांसह ६५ मंदिरातील ट्रस्टींची उपस्थिती होती.
मंदिरे ही संस्कृती व संस्कार यांची ऊर्जाकेंद्रे असून, ती केवळ सेवा केंद्रे न राहता धर्माचरण व प्रसाराची केंद्र व्हावीत, असे आवाहन अनिल सांबरे यांनी केले. या बैठकीत विविध ठराव मंजूर करण्यात आले. श्री राम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त दीपोत्सव व धार्मिक कार्यक्रमांचे १० दिवस आयोजन करावे, सर्व मंदिरे सरकारी नियंत्रणमुक्त बनावीत, मठ-मंदिरांना व्यवस्थापनाचा अधिकार असावा, सर्व हिंदूंसाठी मंदिरे आहेत, मोठ्या मंदिरांनी छोटी मंदिरे दत्तक घ्यावीत, मंदिरे प्रभावी समाजकेंद्रे असावीत आदी ठरावांचा त्यात समावेश आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community