सेलिब्रेटींना बेकायदा लस देण्याचे प्रकरण असो किंवा एकाच महिलेला तीन वेळा लस देण्याचे प्रकरण असो, एकामागून एक गंभीर चुका करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कळवा पूर्व भागात असलेल्या लसीकरण केंद्रावर सोमवारी एका व्यक्तीला कोरोना लस देण्याऐवजी चक्क रेबीजची लस देण्यात आली आहे. लस देण्यात आलेल्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल महापौर नरेश म्हस्के यांनी घेतली असून, यासंदर्भात मंगळवारी त्वरित बैठक घेऊन या लसीकरण केंद्रावरील महिला डॉक्टर आणि नर्सवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
(हेही वाचाः आता मोफत ‘शिवभोजन’ बंद होणार! किती रुपये मोजावे लागणार? वाचा)
काय झाले नेमके?
ठाणे महापालिकेची लसीकरण मोहीम सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे. आरोग्य विभागाच्या एकामागून एक गंभीर चुकांमुळे या विभागाला अनेकवेळा टीकेचे धनी व्हावे लागले. पालिकेच्या वतीने सुमारे ५४ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली असून, यामध्ये पालिकेच्या आरोग्य केंद्रांचा देखील समावेश करण्यात आला आहे. कळवा पूर्व भागात अतिकोनेश्वर नगर येथे ठाणे महापालिकेची शाळा असून, याच शाळेत खाली आरोग्य केंद्र आहे. हा परिसर संपूर्ण डोंगरपट्ट्यात असल्याने या परिसरातील नागरिकांसाठी याच ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सोमवारी या ठिकाणी एका व्यक्तीला कोरोनाची लस देण्याच्या ऐवजी रेबीजची लस देण्यात आली असल्याची गंभीर बाब उघड झाली. पालिकेचे आरोग्य केंद्र असल्याने या ठिकाणी इतर आजारांवर देखील उपचार केले जातात. त्यामुळे या ठिकाणी कोरोना बरोबर रेबीजची लस देखील उपलब्ध होती. आपल्या चुकीची कबुली देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
याआधीही घडल्या अनेक चुका
यापूर्वी सेलिब्रेटींना बेकायदेशीर लस देण्याचे प्रकरणही विरोधकांनी उचलून धरले होते. त्यानंतर एका महिलेला कोरोना लस देताना तीन वेळा सुई टोचल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यावेळी या महिलेला एकाच वेळी तीन डोस दिला असल्याचा आरोप करण्यात आला. तर एक ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर केवळ चौकशीसाठी गेल्यानंतर त्यांना थेट दुसरा डोस घेतला असल्याचा मॅसेज आला होता. आता कोरोनाच्या ऐवजी थेट रेबीजची लस दिली गेल्याने ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
(हेही वाचाः महिला अत्याचारांची सुनावणी आता इन कॅमेरा होणार! उच्च न्यायालयाची नियमावली)
महापौरांनी केली कानउघडणी
या संदर्भात महापौर नरेश म्हस्के यांना माहिती मिळताच, त्यांनी मंगळवारी या संदर्भात आपल्या दालनात पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. दरम्यान ज्या व्यक्तीला रेबीजची लस देण्यात आली आहे. त्याची प्रकृती व्यवस्थित असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
केसपेपर न तपासल्यामुळे दिली चुकीची लस
सोमवारी आतकोनेश्वर केंद्रात राजकुमार यादव ही व्यक्ती कोव्हिशील्ड लसीची चौकशी करण्यासाठी गेल्यावर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. राखी तावडे यांनी यादव यांना लस घेण्याची संमती दिली. मात्र यादव हे आरोग्य केंद्रात ज्या ठिकाणी एआरव्ही इंजेक्शन दिले जाते त्या रांगेत जाऊन बसले. त्यानंतर आरोग्य केंद्रातील परिचारिका कीर्ती पोपेरे यांनी यादव यांचा केसपेपर न तपासता त्यांना एआरव्ही इंजेक्शन दिले. आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी राखी तावडे यांनी लसीकरण कामकाजावर देखरेख आणि नियंत्रण ठेवणे आवश्यक होते. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी कामात कसूर केल्याने हा प्रकार घडला. त्यामुळे या सर्व प्रकाराला जबाबदार धरुन डॉ. राखी तावडे आणि परिचारिका कीर्ती पोपेरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
(हेही वाचाः मुंबई मेट्रो देणार मुंबईकरांना ‘न्यू ईयर गिफ्ट’! ‘या’ दोन मार्गिका सूरू होणार)
Join Our WhatsApp Communityवारंवार घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांमुळे ठाणे महापालिकेची नाहक बदनामी होत आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश महापौरांनी दिले. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून येथील डॉक्टर आणि नर्सवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
-संदीप माळवी -अतिरिक्त आयुक्त, ठा.म.पा