प्रशासनाकडून इन्फ्ल्यूएंझा व कोविडबाबत सुरक्षात्मक उपाययोजना जारी

167

इन्फ्ल्यूएंझा H3N2 व कोविडच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे आढळून आले आहे. या आजाराचा जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने संरक्षणात्मक उपाययोजना जारी केल्या आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्यासोबतच प्रशासनाच्या उपाययोजनाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रुग्णालयात भरती असलेल्या तीव्र श्वसन संक्रमण आजाराच्या (SARI) रुग्णांमध्ये Influenza A subtype H2N3 ने दुषीत असल्याचे दिसून येत आहे. यातील 92 टक्के रुग्णांमध्ये ताप, 86 टक्के रुग्णांमध्ये खोकला, 27 टक्के रुग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, 16 टक्के रुग्णांमध्ये निमोनिया सदृष्य लक्षणे आढळून येत आहे. एकूण तीव्र श्वसन संक्रमण आजाराचे रुग्ण जे H3N2 दुषीत आहेत त्यापैकी 10 टक्के रुग्णांना ऑक्सीजनची गरज आहे तर 7 टक्के रुग्णांना आयसीयुची गरज पडत आहे.

इन्फ्ल्युएंझा H1N1/H3N2 रुग्णांची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत. लक्षणांमध्ये ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोके दुखी ही लक्षणे आढळून येतात. इन्फ्ल्यूएंझा H1N1/H3N2 हा आजार पुढील अतिजोखमीच्या व्यक्तीमध्ये गंभीर स्वरुप धारण करु शकतो. त्यात 5 वर्षांखालील मुले, विशेष करुन 1 वर्षाखालील बालके, 65 वर्षावरील वरिष्ठ नागरिक, गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा इतर हृदय रोग, मधुमेह, फुफ्फुस, यकृत, मुत्रपिंडाचा आजार असणाऱ्या व्यक्ती, चेतनासंस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्ती, प्रतिकार शक्तीचा ऱ्हास झालेल्या व्यक्ती, दिर्घकाळ स्टिरॉईड औषधे घेणाऱ्या व्यक्ती. अतिजोखमीच्या या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

( हेही वाचा: पीएम मित्र पार्क उभारण्यासाठी महाराष्ट्रासह सात राज्यांची नावे जाहीर )

इन्फ्ल्यीएंझा टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे खबरदारी घेणे आवश्यक आहे. शिंकताना आणि खोकताना नाक आणि तोंड झाकावे, आपले हात नियमित आणि साबण, पाण्याने धुवावे, टीशू पेपरचा पुनर्वापर टाळावा, हस्तांदोलन करणे टाळावे, मास्कचा वापर करा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, स्वत:हून औषधे घेणे टाळावे, भरपूर द्रव्य प्यावे, विलगीकरणात राहावे, पौष्टिक आहार घ्यावे, लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करावा. धूम्रपान टाळावे, पुरेशी झोप विश्रांती घ्यावी.

इन्फ्ल्यूएंझा टाळण्याकरता पुढील गोष्टी करु नका. हस्तांदोलन, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका, फ्ल्यू सदृष्य लक्षणे असतील तर इतरांच्यासोबत बसून जेवन करणे टाळावे, गर्दीत जाणे टाळावे. जिल्ह्यांमध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयामध्ये इन्फ्ल्युएंझा H1N1/H3N2 सदृष्य लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी व उपचार केल्या जातो. H3N2 ची लक्षणे दिसताच 72 तासांच्या आत डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास तो नियंत्रणात येऊ शकतो अशा मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाच्यावतीने जारी करण्यात आल्या आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.