- सचिन धानजी, मुंबई
मुंबईतील टप्पा १२ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सुमारे १४ हजार सार्वजनिक तसेच सामूहिक शौचालयांचे बांधकामाला अखेर प्रशासकांनी मान्यता दिली आहे. या १४ हजार शौचालयांच्या बांधकामासाठी काढलेल्या निविदेला स्थगिती देण्यात आली होती, परंतु उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या शौचालयांची कामे होणे आवश्यक असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अखेर याबाबतचा प्रस्ताव प्रशासकांच्या मंजुरीसाठी सादर केला होता. या प्रस्तावाला गुरुवारी मंजुरी प्राप्त झाली असून आता या सर्व शौचालयांच्या कामांवर विभाग कार्यालयांऐवजी मध्यवर्ती खात्यामार्फत देखरेख ठेवली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून टप्पा ११ अंतर्गत आतापर्यंत १९ हजार ८०९ सार्वजनिक शौचकुपांपैंकी १९ हजार ५६ शौचकुपांची उभारणी झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीनेटप्पा १२ अंतर्गत एकूण १४१६६ शौचकुपे बांधण्याचा निर्णय घेत त्यासाठीची निविदा मागवण्यात आली. यासाठीची निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्यानंतर तसेच निविदा अंतिम टप्प्यात असताना महापालिका प्रशासनाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने कॉर्पोरेट कंपन्यांकडून याचे बांधकाम करून घेतले जावे अशी सूचना केली. त्यामुळे प्रशासकांनी ही निविदा स्थगित ठेवून कॉर्पोरेट कंपन्यांचा सहभाग असेल अशाप्रकारे नव्याने निविदा मागवण्याचा निर्णय घेतला.
कार्पोरेट कंपन्यांमुळे निविदेला दिली होती स्थगिती
मात्र, उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासकांना पत्र लिहून ज्या शौचालयांच्या बांधणीसाठी निविदा काढली आहे त्यावरील स्थगिती उठवून कामाला सुरुवात करावी आणि नव्याने काढण्यात येणाऱ्या कामांसाठी कॉर्पोरेट कंपन्यांची मदत घेतली जावी अशी मागणी केली. लोढा यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर प्रशासकांनी शौचालयांच्या बांधणीच्या निविदेवरील स्थगिती उठवून त्यानुसार कंत्राटदारांची निवड केली आणि त्याबाबतच्या प्रस्ताव प्रशासकांच्या मंजुरीसाठी पाठवला होता. त्याला अखेर महापालिका प्रशासकांनी मंजुरी दिली असून लवकरच याचे कार्यादेश बजावून कामाला सुरुवात केली जाणार आहे.
म्हाडाच्या जुन्या शौचालयांच्या जागी नवीन बांधकाम
यापूर्वी शौचालय बांधकामाच्या कामांवर संबंधित खात्याची देखभाल असायची. परंतु पुढे खात्याऐवजी विभाग कार्यालयावर देखभालीची जबाबदारी सोपवली. त्यामुळे शौचालयांच्या बांधकामांबाबत योग्यप्रकारे देखभाल होत नसल्याने टप्पा १२ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या शौचालयांच्या बांधकामाची देखभाल आता विभाग कार्यालयाऐवजी आता पुन्हा मध्यवर्ती खात्याकडेच सोपवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या टप्पा १२ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या शौचालयांमध्ये म्हाडाच्या जुन्या आणि धोकादायक शौचालयांचा समावेश आहे.
त्यामुळे जर शौचालयांच्या बांधकामाची निविदेवरील स्थगिती उठवली नसती तर म्हाडाच्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या सी वन प्रवर्गातील शौचालयांच्या बांधकामांना विलंब झाला होता, त्यामुळे लोढा यांनी यासाठी प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. टप्पा १२ अंतर्गत २८ गटांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रत्येक गटांसाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली असून शहरासाठी ९३. ६८ कोटी रुपये आणि उपनगरांमधील शौचालयांच्या बांधकामांसाठी ४४८.७३ कोटी रुपये अशाप्रकारे एकूण ५४२.४२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.
असा असणार शौचालय उभारणीचा कालावधी
२० शौचकुपांपेक्षा कमी क्षमतेच्या शौचालयांच्या बांधकामासाठीचा कालावधी : ६ महिने
२० ते ४० शौचकुपांच्या क्षमतेच्या शौचालयांच्या बांधकामासाठीचा कालावधी : ९ महिने
४१ व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या शौचालयांच्या बांधकामासाठीचा कालावधी : १२ महिने
(हेही वाचा – I.N.D.I.A. : इंडिया आघाडीच्या लोगोचे ९ डिझाईन, अंतिम निर्णय रखडला)
शौचालयांमध्ये काय असेल सुविधा
काळजीवाहकासाठी खोली, ओव्हरहेड टँक, सक्शन टँक, लहान मुलांसाठी स्वच्छतागृहे. पुरुषांसाठी मुताऱ्या व शौचालयात विद्युत पुरवठा आणि जेथे महानगरपालिकेचा पुरेसा पाणी पुरवठा नसेल तेथे विंधन विहिरीद्वारे पाणीपुरवठा.
शौचालयांची बांधकामे कशी होती
मोडकळीस आलेली जुनी शौचालये तोडून त्याठिकाणी जास्त क्षमतेची दुमजली शौचालये बांधण्यात येतात अथवा जागेच्या उपलब्धतेनुसार नविन शौचालये बांधण्यात येतात. बांधकामा दरम्यान रहिवाश्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जुनी शौचालये तोडण्यापुर्वी तेथे तात्पुरती शौचालये बांधली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community