सीमाभागाचा आणि कोरोनाविरुद्धचा लढा जिंकणारच! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

राज्याची आरोग्य यंत्रणा भक्कम करण्यात येत आहे. समस्त महाराष्ट्रवासियांची एकजूट, निर्धार, संयमाच्या बळावर महाराष्ट्र लवकरच कोरोनावर मात करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

97

महाराष्ट्राचा इतिहास संघर्षाचा आहे. महाराष्ट्राला सहजासहजी काहीही मिळालेले नाही. महाराष्ट्राने प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष केला आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापनाही संघर्षातून, हुतात्म्यांच्या बलिदानातून झाली आहे. सीमाभागातील मराठी गावांना महाराष्ट्रात आणण्यासाठी तसेच कोरोनाच्या महाभीषण संकटावर विजय मिळवण्यासाठी महाराष्ट्राचा संघर्ष आजही सुरु आहे. महाराष्ट्रातील जनतेची एकजूट, निर्धाराच्या बळावर महाराष्ट्र ही दोन्ही उद्दीष्टे साध्य करील, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्रातील जनतेची एकजूट व निर्धाराच्या बळावर!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सहभागी महाराष्ट्रवीरांच्या त्यागाचे स्मरण करुन कृतज्ञता व्यक्त केली तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील शहीद वीरांना आदरांजली वाहिली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी पाहिलेले, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातील समस्त मराठी गावे महाराष्ट्रात सामील करण्याचे स्वप्न अद्याप अपूर्ण असून सीमाभागातील शेवटचे मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत आपला लढा सुरुच राहील, याचा पुनरुच्चारही उपमुख्यमंत्र्यांनी केला. राज्यावरील कोरोना संकटाविरुद्ध महाराष्ट्र एकजूटीने, निर्धाराने लढत आहे. राज्यातील डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलिस, अंगणवाडी सेविका, आशाताई, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज संस्थांचे अधिकारी-कर्मचारी, राज्यभरातले लोकप्रतिनिधी, नागरिक सर्वजण जीवाची जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देत आहेत. या सर्व कोरोनायोद्ध्यांच्या सेवाकार्याची नोंद इतिहासात होईल, असे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

(हेही वाचा : १ मेपासून १८ वर्षांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण सुरु होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा )

कोरोनोविरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येकाने योगदान द्यावे!

कोरोनाच्या संकटकाळात राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य नागरिकांचे जीव वाचवण्याला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने नाईलाजाने राज्यात निर्बंध लागू केले आहेत. प्रसंगी वित्तीय हानी झाली तरी चालेल, मात्र मनुष्यहानी टाळली पाहिजे, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. राज्याची आरोग्य यंत्रणा भक्कम करण्यात येत आहे. समस्त महाराष्ट्रवासियांची एकजूट, निर्धार, संयमाच्या बळावर महाराष्ट्र लवकरच कोरोनावर मात करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला असून कोरोनोविरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येकाने योगदान द्यावे. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात वारंवार धुणे, आदी नियमांचे पालन करुन स्वत:ला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.