‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ चा लाभ कायमस्वरूपी सुरू राहणार; CM Eknath Shinde यांचे आश्वासन

साक्री तालुक्यातील अनेक वर्षांपासून बंद असलेला पांझरा-कान सहकारी साखर कारखाना तसेच पंडीत दीनदयाळ उपाध्याय सूत गिरणी सुरू करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

148
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ चा लाभ कायमस्वरूपी सुरू राहणार; CM Eknath Shinde यांचे आश्वासन

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ मुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत, त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. येत्या १७ ऑगस्ट रोजी महिलांच्या बॅंक खात्यात जुलै, ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरित करण्यात येतील. यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाचवेळी तीन महिन्यांचे साडेचार हजार रूपये दिले जाणार आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शनिवारी (१० ऑगस्ट) महिला सक्षमीकरण मेळाव्यात महिला-भगिनींना आश्वस्त केले. साक्री तालुक्यातील अनेक वर्षांपासून बंद असलेला पांझरा-कान सहकारी साखर कारखाना तसेच पंडीत दीनदयाळ उपाध्याय सूत गिरणी सुरू करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

धुळे जिल्ह्यातील भाडणे (ता. साक्री) येथे शनिवारी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भाडणे (ता.साक्री) येथील नवीन १०० खाटांच्या नवीन उपजिल्हा रुग्णालय तसेच एकलव्य मॉडेल निवासी शाळेच्या इमारतीचे ई-भूमिपूजन तसेच विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अहिराणी या खान्देशी बोलीतून भाषणाला सुरुवात करत महिलांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, “आठे जमेल शेतस् त्या समदा ताईसले मना नमस्कार.. तुमनाकरता ह्या भाऊ नी मुख्यमंत्री मनी लाडकी बहीण हाई योजना आणेल शे…तुमी अर्ज कया ना…आते रक्षाबंधन ना पहले तुमना खाता मा ओवाळणी जमा होणार शे..”

(हेही वाचा – Israel ने हमासच्या 100 दहशतवाद्यांना उडवले; शाळेत सुरु होते कमांड सेंटर)

२५ लाख लखपती दीदी करणार शासन तयार

मुख्यमंत्री म्हणाले की, आजचा महाविराट म्हणावा असा महिला सक्षमीकरणाचा मेळावा आहे. कुणी मला विचारले तर मी आता सांगेल की मला एक नाही लाखो-करोडो बहिणी आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात होऊन एक महिना झाला आहे. सुमारे दीड कोटी माता भगिनींनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत. महिलांच्या हातात पैसा आल्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑगस्ट नंतर बंद होणार असा अपप्रचार खोटा आहे. ही योजना बंद होण्यासाठी सुरु केलेली नाही. ती पुढेही कायम सुरूच राहणार आहे. या योजनेसाठी नुसता हाताने लिहिलेला म्हणजेच ऑफलाईन अर्ज सुद्धा स्वीकारण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या योजनेची माहिती घेऊन आमची पाठ थोपटली आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) यावेळी सांगितले.

शासनाने गरीब घरातल्या मुलींना लखपती करणारी ‘लेक लाडकी योजना’ सुरू केली. यात मुलगी अठरा वर्षांची झाल्यावर तिला एक लाख रुपये मिळेल याची व्यवस्था करण्यात आली आहे. २५ लाख लखपती दीदी शासन तयार करत आहे. आतापर्यंत १५ लाख लखपती दीदी झाल्या आहेत. महिलांना स्वत: त्यांच्या पायावर उभे राहाता यावे यासाठी म्हणून पिंक रिक्षा देण्यात येत आहे. असे ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

(हेही वाचा – Israel वर हल्ला करण्यावर इराण सरकार आणि सैन्यातच मतभेद)

मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, अडीच लाख महिला स्वयं सहायता समूहांना कर्ज दिले आहे. ज्येष्ठांना देवदर्शनासाठी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना सुरू करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरु केली आहे. मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्यात आले आहे. एसटीच्या तिकिटात महिलांना ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेत वयोवृद्ध महिलांना सुद्धा वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत वर्षातून तीन सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. तरूणांसाठी सुद्धा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेत शेतकऱ्यांना ७.५ अश्वशक्ती वीजपंप असणाऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘घरोघरी तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

९ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात सर्व शासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, नागरिकांनी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरांवर, दुकानांवर राष्ट्रध्वज फडकवावा. असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

स्वतः मुख्यमंत्र्यांनी भरला लाडकी बहीण योजनेचा अर्ज…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी जनाबाई वाघ या भगिनीचा अर्ज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भरला आणि त्यावर तिची सही घेऊन तो अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजूरी प्रक्रियेसाठी सुपूर्द केला. यावेळी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, आमदार जयकुमार रावल, आमदारआमश्या पाडवी यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

(हेही वाचा – Drugs : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून ५ हजार ५०० किलो अंमली पदार्थांची विल्हेवाट)

लाभांचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण

या सोहळ्यात विविध योजनांच्या लाभार्थी महिलांना प्रमाणपत्राचे व लाभांचे प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यामध्ये तनुजा लिंगायत, कु.दिक्षा सोनवणे, वैष्णवी मराठे (मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना), आसमा याकुब मन्सुरी, जनाबाई वाघ, इंदुबाई गायकवाड, सुरैय्या जाकीर (१५०० रुपये दरमहा सानुग्रह अनुदान), स्वामी महिला बचत गट-भाडणे, (१० हजार जोखीम प्रवणता निधी), सिध्दीविनायक महिला बचत गट-भाडणे (समुदाय गुंतवणुक निधी ६० हजार रुपये), कुसूम रौंदळे (नोंदणीकृत बांधकाम कामगारास अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप), पुजा सोनवणे (नोंदणीकृत कामगारास गृहपयोगी संच वाटप), योगिता पारधी (केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतंर्गत अर्थसहाय्य योजना), मनिषा पाटील (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम), सविता बारीस (बिरसा मुंडा कृषी क्रांति योजना), मोनिका गवळी (प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना), सोनाली गोरे (मोदी आवास योजना), विद्याबाई मराठे (प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना), वंदनाबाई बारसे (इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना), नलिनी देवरे (ड्रोन दिदी), वैष्णवी पाटील, पुजा चव्हाण (नवनियुक्त तलाठी नियुक्ती पत्र) या महिला लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले. यातील काही महिलांनी शासकीय योजनांच्या लाभामुळे जीवनमानात झालेल्या बदलाविषयी मनोगत व्यक्त केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.