घरोघरी तिरंगा फडकावल्याबद्दल आयुक्तांनी मानले मुंबईकरांचे आभार

149

आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याचा आज ७५वा वर्धापनदिन असून त्यानिमित्त, भारतातील अग्रगण्य महानगरपालिकांपैकी एक असलेल्या मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांनी मुंबईकरांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या घरोघरी तिरंगा अर्थात ”हर घर तिरंगा” अभियानासाठी मुंबई महानगरपालिकेने स्वतः सर्व मुंबईकरांसाठी राष्ट्रध्वज तिरंगा खरेदी करण्याचा आणि  ते घरोघरी पोहचविण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील नागरिकांनी राष्ट्रध्वज संहितेनुसार तिरंगा ध्वजाचा मान राखून आपल्या घरावर तिरंगा फडकाविल्याबद्दल संपूर्ण मुंबईकरांचे आभार मानले. तसेच संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने जोमाने कार्यरत राहून घरोघरी तिरंगा अभियान यशस्वी होण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.

१६० कोटी रुपयांचा अतिरिक्त आकार माफ

मुंबई महानगरपालिकेने मे २०२२ मध्ये सर्वांसाठी पाणी हे धोरण जाहीर करुन १ जानेवारी २००० नंतरच्या झोपडपट्टीधारकांना खाजगी व सरकारी जमिनीवर वसलेल्या झोपडपट्टीधारकांना, गावठाण व कोळीवाड्यातील बांधकामे व काही कारणासाठी अपूर्ण राहिलेल्या तसेच अनधिकृत इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांना रितसर अर्ज करुन अधिकृत जलजोडणी प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त झाला प्रशासकांनी यावेळी भाषणांत स्पष्ट केले. कोरोनाच्या अचानक उद्भवलेल्या संकटामुळे थकित जलदेयकांवर आकारण्यात आलेला अतिरिक्त आकार माफ करुन त्याचे अधिदान करण्यासाठी अंमलात आणलेल्या अभय योजनेची मूदत वेळोवेळी  वाढविण्यात आली. या संधीचा तब्बल १,४३,१३९ जलजोडणी धारकांनी लाभ घेवून सुमारे १६० कोटी रुपयांचा अतिरिक्त आकार माफ करून घेतला.

(हेही वाचा आम्ही फक्त अल्लाची पूजा करतो, म्हणून वंदे मातरम म्हणणार नाही! रझा अकादमीचा विरोध)

८२८ सामुदायिक स्वच्छतागृहे बांधण्याचे लक्ष्य

स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका ही महत्वाची प्रशासकीय यंत्रणा असल्याने राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने शहरातील स्वच्छता राखण्यासाठी एकत्रित आणि संयुक्त प्रयत्न केले जात आहेत. मुंबई महानगरपालिकेने रस्ते सफाईसाठी पर्यावरण पुरक इ -स्वीपर यंत्रे घेण्याचे काम हाती घेतले आहे. ३५ ई –वाहने परिवहन विभागामार्फत घेण्यात येणार आहेत. तसेच ओल्या कचऱयाची विकेंद्रकित स्वरुपात विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई शहरात ९ ठिकाणी २ मेट्रिक टन क्षमतेची बायोमिथेशन सयंत्रे उभारण्यासाठी निविदा प्रकिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत निर्माण होणाऱ्या सुमारे ७० टन प्रतिदिन इतक्या घरगुती घातक कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्याकरिता मुंबई महानगरपालिकेने ३ प्रकल्प कार्यान्वित केले असून ८ नवीन प्रकल्पांसाठी निविदा मागविण्यात आल्या असल्याचेही प्रशासकांनी आपल्या भाषणांत नमुद केली. स्वच्छ भारत अभियानातंर्गत सन २०२१ पर्यंत १२,८१९ आसनांची ५६२ स्वच्छतागृहे बांधून पूर्ण झाली आहेत. ६६३५ आसनांच्या २६६ स्वच्छतागृहांचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच २०२२ वर्षासाठी १९,४५४ आसने असलेली ८२८ सामुदायिक स्वच्छतागृहे बांधण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.

६०० टन प्रति दिन क्षमतेच्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया

सध्यस्थितीत घन कचरा व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या ४६ वसाहतींमध्ये केवळ ५५९२ सेवा निवासस्थाने उपलब्ध आहेत. घन कचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांना चांगल्या निवासी सुविधा देण्याकरिता उपलब्ध ३० वसाहतींचा पुनर्विकास करुन १३,००० सेवा निवासस्थाने निर्माण करण्याचे प्रस्ताविले आहे. महानगरपालिकेने देवनार क्षेपणभूमी येथे कचऱ्यापासून उर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्याचे नियोजिले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ६०० टन प्रति दिन क्षमतेच्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करुन उर्जा निर्मिती करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी कंत्राटदाराची नेमणूक केलेली आहे. प्रकल्पाचे आखणी व बांधकामाचे काम सुरु झाले आहे. सदर प्रकल्पामधून सुमारे ६०० टन प्रति दिन कचऱयावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करुन सुमारे ४ मेगावॅट प्रतिदिन उर्जा निर्मिती होईल. मुलुंड क्षेपणभूमी येथे अस्तित्वात असलेल्या कच-यावर योग्य तंत्रज्ञानाचा वापर करुन जमीन पुर्नप्राप्त करण्यासाठीच्या प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये सुमारे ७ दशलक्ष टन जुन्या  कचऱ्यावर प्रक्रीया करुन त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. तसेच क्षेपणभूमीची सुमारे २८ हेक्टर जमीन पुर्नप्राप्त होणार आहे. जुलै २०२२ पर्यंत ९ लाख ९७ हजार टन कच-यावर प्रक्रिया करुन  विल्हेवाट लावण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.