- विशेष प्रतिनिधी, मुंबई
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी २६ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. त्यासोबतच वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस् जंक्शन आदी भागातील प्रवाशांना किनारी रस्ता प्रकल्पावर ये-जा करण्याची सुविधा देणाऱ्या तीन आंतरमार्गिकांचे लोकार्पणही यावेळी होणार आहे. सोमवारी २७ जानेवारी २०२५ पासून या सर्व मार्गिंकावरून प्रत्यक्ष वाहतूक सुरू होणार आहे. तसेच मुंबई किनारी रस्ता दररोज सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत खुला राहणार आहे. (Coastal Road)
मुंबईच्या दक्षिण टोकापासून ते उत्तर मुंबईच्या टोकापर्यंत, म्हणजे नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बांधण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यांतर्गत शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचा धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी १०.५८ किलोमीटर इतकी आहे. आजपर्यंत प्रकल्पाची ९४ टक्के बांधणी पूर्ण झाली आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरून १२ मार्च २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत ५० लाख वाहनांनी ये-जा केली आहे. तसेच या मार्गावरून दररोज सरासरी १८ ते २० हजार वाहनांचा प्रवास सुरू असतो. (Coastal Road)
(हेही वाचा – Delhi Assembly Election : २२ दलबदलू उमेदवार निवडणुकीच्या मैदानात)
या प्रकल्पातील दक्षिण मुंबईकडून उत्तर मुंबईकडे जाणारी वाहतूक वरळी-वांद्रे सेतूला जोडण्यासाठी दोन पूल बांधण्यात आले आहेत. त्यातील दक्षिणेकडे येण्यासाठी बांधलेल्या पहिल्या पुलाचे लोकार्पण १२ सप्टेंबर २०२४ रोजी झाले. वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी या दक्षिण वाहिनी पुलावरून उत्तरेकडे (वांद्रेकडे) जाणाऱ्या वाहतुकीला मुभा देण्यात आली होती. आता उत्तर वाहिनी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या दोन्ही पुलावरून नियमित दिशांकडे वाहतूक सुरू होणार आहे. लोकार्पण होणाऱ्या पुलाची लांबी ८२७ मीटर इतकी आहे. यामध्ये समुद्रावर असलेली लांबी ६९९ मीटर तर पोहोच रस्ता १२८ मीटर यांचा समावेश आहे. हा पूल बांधण्यासाठी सुमारे २४०० मेट्रिक टन वजनाची तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) स्थापन करण्यात आला होता. या तुळईची लांबी १४३ मीटर तर रुंदी २७ मीटर आणि उंची ३१ मीटर इतकी आहे. (Coastal Road)
मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी पहिली तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) २६ एप्रिल २०२४ रोजी स्थापन करण्यात आली. तर, वांद्रे – वरळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या मार्गावरील दुसरी तुळईदेखील १५ मे २०२४ रोजी स्थापन करण्यात आली. तुळई स्थापन केल्यानंतर पूल बांधणीची पुढील कामे वेगाने पूर्ण करण्यात आली. दोन्ही पुलांचे काम पूर्ण झाल्यामुळे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाचे वरळीकडील दोन्ही टोक आता थेट जोडले गेले आहेत. परिणामी शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) ते वांद्रे असा उत्तर दिशेने आणि वांद्रे ते शामलदास गांधी मार्ग असा दक्षिण दिशेने म्हणजेच दुतर्फा प्रवास करणे शक्य झाले आहे. (Coastal Road)
(हेही वाचा – ‘दक्ष’ प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी शासन गतीने कार्यवाही करणार; कौशल्य विकास मंत्री Mangal Prabhat Lodha यांची ग्वाही)
बो आर्च स्ट्रिंग गर्डर (उत्तर वाहिनी मार्गिका) खुली केल्यानंतर खालील मार्ग वाहतुकीसाठी खुले होणार
- मरीन ड्राईव्हकडून मुंबई किनारी रस्ता मार्गे सागरी सेतूकडे जाणारी वाहतूक ही लोकार्पण होत असलेल्या उत्तर वाहिनी पुलावरून सुरू होणार आहे.
- यापूर्वी मरीन ड्राईव्हकडून सागरी सेतूकडे जाणारी वाहतूक ही दक्षिण वाहिनी पुलावरून सुरू ठेवली होती. मात्र त्यासाठी आता उत्तर वाहिनी पूल उपलब्ध झाला आहे. परिणामी दक्षिण वाहिनी पुलाचा वापर नियमित दिशेने म्हणजेच वांद्रेकडून मरीन ड्राईव्हकडे येण्यासाठी करता येईल.
- त्याचप्रमाणे मरीन ड्राईव्हकडून प्रभादेवीकडे किनारी रस्यावरून जाण्यासाठी बांधलेली आंतरमार्गिका देखील खुली होणार आहे. तसेच मरीन ड्राईव्हकडून बिंदू माधव ठाकरे चौकाकडे जाणारी वाहतूकही खुली होणार आहे. त्यामुळे लोअर परळ, वरळी नाका आणि लोटस जंक्शनकडे जाणारी वाहतूक खुली होईल.
- तसचे बिंदू माधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिकाही खुली होणार आहे.
(हेही वाचा – Water Cut : मालाड लिबर्टी गार्डनजवळील जलबोगद्याला गळती; शुक्रवारी रात्रीपासूनच तातडीने कामाला सुरुवात)
मे. टाटा सन्स लिमिटेड अॅण्ड अफेलेटस् करणार दुभाजक सुशोभीकरण
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामध्ये प्रियदर्शनी पार्कपासून तर वरळीपर्यंत जवळपास ४.३५ किलोमीटर अंतरापर्यंत म्हणजे ४.८३ हेक्टर इतक्या क्षेत्रावरील दुभाजकांचे टाटा सन्स लिमिटेड अॅण्ड अफेलेटस् कडून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर फंड) हे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या सुशोभीकरणाचा शुभारंभही मुख्यमंत्री फडणवीस व मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी वृक्षारोपण करून करण्यात येणार आहे. (Coastal Road)
किनारी रस्ता प्रकल्पातील आत्तापर्यंतचे टप्पे :
११ मार्च २०२४ : मुंबई किनारी रस्ता प्रकल्पात बिंदूमाधव ठाकरे चौक (वरळी) ते मरीन ड्राईव्ह ही दक्षिणवाहिनी मार्गिका (९.२९ किलोमीटर)
१० जून २०२४ : मरीन ड्राईव्ह ते हाजी अलीमार्गे लोटस जंक्शन पर्यंतची उत्तरवाहिनी मार्गिका (६.२५ किलोमीटर)
११ जुलै २०२४ : हाजी अली ते वांद्रे-वरळी सागरी सेतूला जाण्याकरीता खान अब्दुल गफार खान मार्गाला जोडण्यात येणारी मार्गिका (तात्पुरत्या स्वरुपात, ३.५ किलोमीटर)
१३ सप्टेंबर २०२४ : उजवीकडील पुलावरून वांद्रेकडे जाणारी वाहतूक
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प कसा आहे?
एकूण १०.५८ किलोमीटर लांब असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पात भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते यांचा समावेश आहे. तसेच अमरसन्स, हाजी अली व वरळी येथे आंतरमार्गिका अर्थात इंटरचेंज आहेत. तसेच प्रत्येकी २ किलोमीटर लांबीचे दोन स्वतंत्र भूमिगत जुळे बोगदे करण्यात आले आहेत. या बोगद्यात सहा व इतर ठिकाणी ८ मार्गिका आहेत. या बोगद्यांना तब्बल ३७५ मिमी जाड काँक्रिटचे अस्तर आहे. या बोगद्यांमध्ये भारतात प्रथमच वापरात येत असलेली अत्याधुनिक सकार्डो ही वायुवीजन प्रणाली आहे. आपत्कालीन उपाययोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकंदर १० छेद बोगदे देखील आहेत. तसेच या प्रकल्पातून ७० हेक्टर हरितक्षेत्र निर्मिती केली जात आहे. (Coastal Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community