सचिन धानजी
मुलुंड पूर्व येथील जयहिंद कॉलनीतील नानेपाडा नाल्यावरील पूल बंद असून या पुलाची पुनर्बांधणी करून त्यांचे रुंदीकरण केले जाणार आहे. हे पूल अरुंद असल्याने मोठी वाहने वळवण्यास मोठी अडचण होते. त्यामुळे या नाल्यावरील पुलाचे रुंदीकरण करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होत होती, त्यामुळे महापालिकेन या पुलाची रुंदी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर या पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
जयहिंद नगर येथील नानेपाडा नाल्यावरील सध्याचे पूल हे साडे ०९ मीटर लांब आणि ३.७ मीटर रुंद आहे. त्यामुळे या अरुंद असलेल्या पुलावरून रुग्णवाहिका, शाळेची बस तसेच अग्निशमन दलाची वाहने वळवण्यास त्रास होतो. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास लक्षात घेता स्थानिक नगरसेवक असलेल्या प्रभाकर शिंदे यांनी या पुलाची रुंदी वाढवून या पुलाची पुनर्बांधणी करण्याची मागणी केली. त्यानुसार महापालिकेने सल्लागाराच्या सल्ल्यानुसार याच्या बांधकामाचा आराखडा तयार केला असून आता हे पूल १८. ७६० मीटर लांब आणि ८ मीटर रुंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या पुलाची तपासणी संस्थेमार्फत तपासणी केली असता त्यांनी हे पूल धोकादायक असल्याचा अहवाल दिला तसेच वाहतुकीसाठी हे पूल त्वरीत बंद करण्याचा सुचना केल्या. त्यानुसार हे पूल दोन महिन्यांपूर्वी बंद करण्यात आले आहे. सद्यस्थितीत हे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. त्यामुळे या पुलाच्या बांधकामासाठी निविदा मागवण्यात आली असून ही निविदा प्रक्रियाही पूर्ण झाल्याची माहिती पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे या पुलाच्या बांधकामासाठी डिसेंबर २०२२मध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रत्यक्षात या कामाला आणि कंत्राट नेमणुकीच्या प्रस्तावाला जून महिन्यात मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यामुळे हे काम जिथे पावसाळ्यापूर्वी सुरु होऊन नागरिकांना पुढील पावसाळ्यापूर्वी या पुलाचा वापर करता आला असता ते काम आता पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अशक्यच असल्याने येणारा दुसरा पावसाळाही पुलाविना घालवावा लागणार आहे. या पुलासाठी मागवलेल्या निविदेमध्ये अनंत इन्फ्रालिंक ही कंपनी पात्र ठरली असून या कंपनीने उणे २० टक्के कमी दर लावून हे काम १ कोटी ८३ लाखांमध्ये मिळवले आहे. त्यामुळे विविध करांसह तसेच सल्लागार शुल्कासह या पुलाच्या बांधकामासाठी २.४० कोटी रुपये खर्च येणार आहे.
स्थानिक माजी नगरसेवक असलेल्या प्रभाकर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे पूल धोकादायक ठरल्याने दोन महिन्यांपूर्वी बंद करण्यात आले. परंतु या पुलाच्या बांधकामासाठी डिसेंबर २०२२मध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही या प्रस्तावाला मंजुरी द्यायला सात महिने का उजाडले. तेव्हा महापालिकेत समिती प्रस्ताव अडवून ठेवतात असा आरोप व्हायचा आता तर प्रशासक असतानाही प्रस्ताव मंजुरीला येण्यासाठी सात महिन्यांचा कालावधी का लागतो. त्यामुळे जर याला जानेवारी महिन्यांतच याला मंजुरी मिळाली असती तर या पुलाचे ५० टक्के काम पूर्ण झाले असते, असे त्यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान; म्हणाले….)
या पुलाची वैशिष्टे
पुलाची लांबी : १८.७६० मीटर
पुलाची रुंदी : ८ मीटर
स्पॅन संख्या : २
बांधकामाचा प्रकार : आरसीसी स्लॅब क्रॅशा बॅरिअर
हेही पहा –
Join Our WhatsApp Community