मुंबईत मागील काही दिवसांपासून मृत्यूचा आकडा ७० ते ८०पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. यामुळे आता स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी व गॅसभट्टीवर ताण येऊ लागला आहे. मात्र, या वाढत्या मृत्यूच्या आकड्यांमुळे अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीबाहेर शववाहिकांच्या रांगा लागलेल्या असून, मागील कोविडमध्ये स्मशानभूमीची माहिती डॅशबोर्डवर उपलब्ध करुन दिली होती. त्यामुळे डॅशबोर्डवर पाहून ज्या स्मशानभूमीत जागा आहे, तिथेच शवागारातून अंत्यसंस्कारासाठी शववाहिका पाठवल्या जात असत. परंतु कोविड संपला या आविभार्वात आरोग्य विभागाने ही डॅशबोर्ड प्रणाली मोडीत काढली. परिणामी काही ठराविकच स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी गर्दी होऊन भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
२४ तास विद्युत व गॅसदाहिनी सुरू
मुंबईत सध्या कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यास, त्यांच्यावर विद्युतदाहिनीवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. परंतु मुंबईत केवळ ११ स्मशानभूमीत विद्युत व गॅस दाहिनी असून, या सर्वांवर कोविडबाधित रुग्णांवरील अंत्यसंस्कारामुळे भार वाढू लागला आहे. कोविडच्या आजारापूर्वी अपवादात्मक परिस्थितीत मृतदेहावंरच विद्युतदाहिनींवर अंतिम संस्कार होत असत. परंतु आता यासाठी २४ तास विद्युत व गॅसदाहिनी सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
इतकी आहे क्षमता
मुंबईत विविध ५४ ठिकाणी महापालिकेची ७१ अंतिम संस्कार स्थळे आहेत. यापैकी ११ ठिकाणी विद्युत व गॅसदाहिनी आहेत. यातील शिवाजी पार्कसह शीव व इतर स्मशानभूमींतील विद्युत दाहिनींचे रुपांतर पीएनजीवर करण्यात आले आहे. त्यामुळे काही दाहिन्या या विद्युत आहेत, तर काही दाहिन्या पीएनजीवर आधारित आहेत. या सर्व ११ स्मशानभूमींत १९ विद्युत तसेच पीएनजी आधारित शवदाहिन्या आहेत. विद्युत व गॅस दाहिनीवर पूर्ण दिवसभरात १४४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची क्षमता आहे.
(हेही वाचाः लसीकरण केंद्रच ठरणार नगरसेवकांची डोकेदुखी)
काय आहे अधिका-यांचे म्हणणे?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये पुन्हा एकदा मृत्यूचा आकडा वाढून दररोज सरासरी ८० वर जाऊन पोहोचला आहे. परंतु या वाढलेल्या मृत्यूच्या आकड्यांमुळे स्मशानभूमीसमोरील शववाहिकांची रांग वाढत जाताना दिसत आहे. काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही मोजक्याच स्मशानभूमींमध्ये ही परिस्थिती पहायला मिळत आहे. शिवाजी पार्क, वरळी, बोरीवली, मालाड, भांडूप आदी महत्वाच्या ठिकाणीच ही गर्दी होत असून, उर्वरित स्मशानभूमींमध्ये अशी परिस्थिती नाही. मुंबईतील स्मशानभूमींची संख्या पुरेशी असून त्यामध्ये दैनंदिन २५० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची क्षमता आहे. त्यामुळे सध्या जे काही चित्र दाखवले जाते, ते वस्तुस्थितीला धरुन नसल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
डॅश बोर्ड बंद केल्याने होते गर्दी
मागील मे महिन्यामध्ये जेव्हा मृत्यूचा आकडा वाढला होता, तेव्हा प्रत्येक स्मशानभूमीबाहेर शववाहिकांना चार ते आठ तासांची प्रतीक्षा करावी लागत असे. त्यावेळी महापालिका प्रशासनाने स्मशानभूमींची माहिती जाणून घेण्यासाठी डॅशबोर्डची व्यवस्था केली होती. या डॅशबोर्डच्या अॅपवरुन आपल्याला कोणत्या स्मशानभूमीतील चिता अथवा भट्टी रिकामी आहे, याची माहिती मिळत होती. तसेच कोरोनाचा रुग्ण असेल तर शवागारातून त्यांना नजिकच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी पाठवताना कोणत्या ठिकाणी गर्दी कमी आहे किंवा जागा आहे याची माहिती घेऊन त्याप्रमाणे जागा बूक करावी आणि तिथे शववाहिका पाठवावी असा प्रकार होत होता. परंतु ही डॅशबोर्ड पध्दतच बेदखल केल्यामुळे पुन्हा एकदा काही ठराविक स्मशानभूमींबाहेरील गर्दी वाढून मुंबईकरांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
(हेही वाचाः नवीन कोविड केंद्रांमध्ये लहान मुलांसाठी व्यवस्था करण्याचा विचार)
लवकरच डॅशबोर्ड पुन्हा सुरू होणार
यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमोरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ही प्रणाली पुन्हा सुरू केली जाणार असल्याचे सांगितले. महापालिका आयुक्तांनी याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्वांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार येत्या एक ते दोन दिवसांमध्ये ही प्रणाली सुरू होईल आणि त्यामुळे शवागारातून स्मशानभूमीतील माहिती जाणून दाहिनी बूक करता येईल. त्यामुळे ज्या काही ठराविकच स्मशानभूमींमध्ये जी गर्दी होते, त्याचे योग्यप्रकारे नियोजन केल्यामुळे ही गर्दी कमी होईल, असे त्या म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community