महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कटिबध्द असल्याची हमी वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे. नाशिक बाजार समितीने कांदा खरेदी थांबविल्यामुळे महाराष्ट्रातील उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवार, २९ सप्टेंबर रोजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासोबत उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पणन मंत्री सत्तार यांनी पत्रकारांना सांगितले की, कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्याची तयारी आहे. वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी याबाबत हमी दिली आहे, असे त्यांनी सांगितले. महत्वाचा मुद्या असा की, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लावला आहे. नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांना केंद्राच्या या निर्णयाला विरोध दर्शवित संप पुकारला आहे. सरकारने हे शुल्क परत घ्यावे अशी त्यांनी मागणी आहे. दरम्यान, या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी दिल्लीकडे धाव घेतली.
(हेही वाचा – Dawood Ibrahim : दाऊदचा ‘अंकल’ भारतातील बनावट नोटांचा वितरक)
केंद्र सरकारने लावलेल्या ४० टक्के कराच्या निर्णयाचा फेरविचार केला जाईल. एवढेच नव्हे तर, कांदा वाहतुकीवर अनुदान देण्यासही केंद्र सरकार तयार आहे, अशी हमी पियूष गोयल यांनी आजच्या बैठकीत दिली असल्याचे सत्तार यांनी यावेळी सांगितले. केंद्र सरकारने दोन लाख टन कांदा खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे, कोणत्याही शेतकऱ्यांच्या शेतात कांदा पडून राहणार नाही. त्याची लगेच खरेदी होणार असल्यामुळे तो खराबही होणार नाही. नाफेड आणि एनसीसीएफ या दोन्ही संस्थांकडून एक-एक लाख टन कांदा खरेदी केला जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community