तुम्ही कर चुकवताय, तर ‘या’ मोहिमेअंतर्गत होईल कारवाई!

137
सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयाच्या दक्षिण मुंबई कर-चुकवेगिरी विरोधी शाखेने रविवारी 13 फेब्रुवारी 2022 रोजी ऋषभ बुलियन या सोन्याचांदीच्या वस्तूंचा व्यापार करणाऱ्या कंपनीच्या भागीदाराला 7 कोटी 11 लाख रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट तयार केल्याप्रकरणी अटक केली आहे.

कंपन्या अस्तित्त्वात नाहीत

प्रधान मुख्य आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेश सीजीएसटीच्या केंद्रीय गुप्तचर पथकाने दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई करण्यात आली. ऋषभ बुलियन (GSTIN 27AAMR1367B1Z9) या कंपनीच्या मुख्य व्यवहारांच्या ठिकाणी 11 फेब्रुवारी 2022 रोजी धाड टाकून, शोधमोहीम राबवण्यात आली. या कंपनीच्या भागीदाराने आज दिलेल्या निवेदनाद्वारे गोल्डमाईन बुलियन आणि रिद्धी बुलियन या कंपन्या मुंबईत असल्याचे भासवून त्यांच्याशी केलेल्या व्यवहारातून 7 कोटी 11 लाख रुपयांचे अस्वीकारणीय इनपुट टॅक्स क्रेडीट हडपल्याची कबुली दिली. या दोन कंपन्यांच्या उल्लेखित उद्योगाच्या ठिकाणी जाऊन केलेल्या तपासणीअंती या दोन्ही कंपन्या बनावट असल्याचे आणि अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले. ऋषभ बुलियन या कंपनीने गोल्डमाईन बुलियन कडून 4 कोटी 89 लाख रुपये तर रिद्धी बुलियन कडून 2 कोटी 22 लाख रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडीट मिळवले.

न्यायालयीन कोठडी

तपासणी दरम्यान, मिळालेले पुरावे तसेच निवेदन यांच्या आधारावर सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 69 अन्वये ऋषभ बुलियन या कंपनीच्या भागीदाराला अटक करून, त्याच्यावर सीजीएसटी कायदा 2017 मधील कलम 132(1)(क) आणि कलम 132(5) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याला आज मुंबईच्या अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर हजार करण्यात आले आणि नंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

( हेही वाचा: सावधान! सोशल मीडियामधून आक्षेपार्ह पोस्ट शेअर करताय? हे वाचा…)

मोहीम अधिक तीव्र होणार

करचुकवेगिरी करणाऱ्यांच्या विरोधात सीजीएसटी कार्यालयाच्या मुंबई विभागाने सुरु केलेल्या, मोहिमेचा भाग म्हणून ही संपूर्ण कारवाई करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत, सीजीएसटी मुंबईच्या दक्षिण क्षेत्र आयुक्तालयाने आतापर्यंत सुमारे 570 कोटी रुपयांची करचुकवेगिरी उघडकीस आणली असून, त्यापैकी 7 कोटी रुपये वसूल केले आहेत आणि गेल्या सहा महिन्यांत एकूण आठ जणांना संबंधित प्रकरणी अटक करण्यात आली आहे. करचुकवेगिरीशी संबंधित असण्याची शक्यता असलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी सीजीएसटी विभाग, डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करत आहे, तसेच करचुकवेगिरी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी इतर कर अधिकाऱ्यांशी समन्वय देखील साधत आहे. येत्या काही काळात, करचुकवेगिरी विरुद्धची ही मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी विभागातर्फे नियोजन केले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.