‘त्या’ झाडांना पुनर्जीवित करण्यासाठी अधिकाऱ्याने राबवली अनोखी संकल्पना

त्या झाडांचे खोड मुळासकट पुन्हा एकदा खड्डयांमध्ये उभे करुन लावण्याचा प्रयत्न करायला हवा. यासाठी प्रत्येक विभागातील जनतेने, नगरसेवकांनी पुढे यायला हवे.

मुंबईत तौक्ते चक्रीवादळामुळे अनेक झाडांची पडझड झाल्यानंतर, अनेक उन्मळून पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावली जात आहे. मुळाच्या जागेवर निर्माण झालेल्या खड्डयांमध्ये झाडाचे रोपटे लावून, वृक्षारोपणाचा कार्यक्रम उरकून घेतला जात आहे. परंतु अशाचप्रकारे उन्मळून पडलेल्या झाडांच्या खोडाचा भाग कापून उर्वरित भाग मुळासकट पुन्हा त्याच खड्डयांमध्ये उभे करत, एकप्रकारे या जुन्या झाडाला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या निवृत्त सहाय्यक आयुक्ताने केला आहे.

असे केले झाड पुनर्जीवित

मुंबईत दोन आठवड्यांपूर्वी तौक्ते वादळामुळे अनेक झाडांची पडझड झाली. यामध्ये अनेक झाडे ही उन्मळून पडली होती. परंतु महापालिकेच्या उद्यान विभागाचे कर्मचारी आणि त्यांनी नेमलेले कंत्राटदार या पडलेल्या झाडांची कापणी करुन, मुळापासूनचा काही भाग तिथेच ठेऊन जात आहेत. मागील आठवड्यात जेव्हा महापालिकेच्या बी विभागाचे निवृत्त सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर हे माझगाव येथून जात असताना, त्यांना अशाप्रकारे झाडे कापून त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करताना दिसले. मग त्यांनी स्वत: माझगाव येथील सेंट मेरी स्कूल परिसरातील एक झाड अशाचप्रकारे स्कूलच्या फादरच्या मदतीने त्यांनी महापालिकेच्या प्रभाग कार्यालयामधून जेसीबी व माती उपलब्ध करुन, मुळाचा भाग पुन्हा खड्डयात उभा करत त्यांना पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला.

(हेही वाचाः उन्मळून पडलेल्या झाडांचा असाही केला नगरसेवकाने उपयोग)

जुन्या वृक्षाला फुटू शकते पालवी

महापालिकेचे निवृत्त अधिकारी असलेले शिरुरकर हे पर्यावरणासाठी झटत असून, त्यांच्या मते ही झाडे उन्मळून पडतात ती मृत झाल्यामुळे किंवा मुळांनी माती सोडल्यामुळे. त्यामुळे या झाडावरील फांद्यांचा भार हलका करुन त्यांचे मूळ जर पुन्हा खड्डयात ओढून त्यावर मातीचा भराव करुन उभे केल्यास, त्याला पुन्हा पालवी फुटेल. त्यामुळे काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा एक जुने वृक्ष पुन्हा दिमाखात उभे राहू शकते.

पुढाकार घेण्याची गरज

परंतु झाड उन्मळून पडले म्हणून त्याचे मूळ जर काढून टाकल्यास आणि त्यावर रोपटी लावल्यास ती मोठी होईपर्यंत अनेक वर्षांचा कालावधी लोटू शकतो. त्यामुळे पर्यावरणाचा विचार करता मुंबईतील प्रत्येक विभागांमध्ये अशाप्रकारे जी झाडे उन्मळून पडलेली आहेत आणि ती झाडे कापून ठेवली आहेत, त्या झाडांचे खोड मुळासकट पुन्हा एकदा खड्डयांमध्ये उभे करुन लावण्याचा प्रयत्न करायला हवा. यासाठी प्रत्येक विभागातील जनतेने, नगरसेवकांनी पुढे यायला हवे.

(हेही वाचाः महापालिका मलबार हिलकडील झाडांचे आरोग्य तपासणार!)

माझगाव येथील शाळेच्या परिसरात अशाप्रकारे एका झाडाला पुनर्जिवीत करताना, सेंट मेरी स्कूलचे फादर आणि स्थानिक नगरसेविका सोनम मनोज जामसूतकर यांचे योगदान लाभले. असाच प्रयत्न प्रत्येक नगरसेवक तसेच संस्थांनी करुन जागतिक पर्यावरण दिन साजरा करावा, असे आवाहन शिरुरकर यांनी केला.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here