दहिसर पश्चिम कांदरपाडा लिंक रोड ते भाईंदर पश्चिम सुभाषचंद्र बोस उद्यानापर्यंत महापालिकेच्यावतीने उन्नत मार्ग बांधण्यात येत असून यासाठी तब्बल विविध करांसह ४०२७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या प्रकल्पाच्या वाढलेल्या खर्चाला काँग्रेस पक्षाने तीव्र विरोध केला असून जून २०१६ रोजी हा प्रकल्प जेव्हा आला तेव्हा त्याची प्रस्तावित किंमत १६०० कोटी एवढी होती, पण प्रत्यक्षात निविदा काढताना त्यांची किंमत १९९८ कोटी एवढी झाली होती, पण आता तर थेट ४००० कोटी रुपये, म्हणजे मुंबईकरांच्या पैशाची दिवसाढवळ्या लूटच सुरु असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी नगरसेवक व महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण-एम. एम. आर. डी. ए (MMRDA) यांनी मुंबई शहराच्या पश्चिमेकडील क्षेत्रांना कांदरपाडा, लिंकरोड, दहिसर (पश्चिम) पासून सुभाषचंद्र बोस उद्यान, भाईंदर (पश्चिम) पर्यंत जोडणाऱ्या उन्नत मार्ग प्रकल्पाचे काम हाती घेतले होते. परंतु, या प्रकल्पाचे काम त्यांनी सुरू केले नाही. या पुलाच्या जोडणाऱ्या मार्गात महापालिकेची हद्द १४८० मीटर लांबीची असून मिरा-भाईंदर महानगरपालिकेची हद्द ही ३१०० मीटर लांबीची आहे. ४५ मीटर रुंदीचा हा मार्ग आहे. यासाठीची पहिली निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्यानंतर आता नव्याने मागवलेली निविदा अंतिम झाली आहे. यामध्ये विविध करांसह ४०२७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामासाठी लार्सन अँड टुब्रो लिमिटेड अर्थात एल अँड टी ही कंपनी पात्र ठरली आहे. हा सर्व खर्च महापालिकेच्या तिजोरीतून खर्च केला जाणार आहे.
(हेही वाचा – Indian Navy : भारतीय नौदलाने ‘खमरी मो सिक्किम’ कार रॅलीला दाखवला हिरवा झेंडा)
याबाबत महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याचा तीव्र विरोध करून दहिसर-भाईंदर प्रकल्पाची किंमत १९९८ कोटींवरून वाढवून ती थेट ४००० कोटींवर प्रकल्प सुरु व्हायच्या आधीच नेऊन नेहमीप्रमाणे मुंबई महापालिकेने दाखवून दिले आहे की, ते कशीही मनमानी करू शकतात आणि कोणीही त्यांना विचारणारं नाही. या मनमानीचा काँग्रेस पक्ष कडाडून विरोध करत आहे. ज्यांनी कोविडच्या काळात मुंबई महापालिकेच्या तिजोरीची लूट केली, तीच व्यवस्था जर आता निर्णय घेऊन पुन्हा लूट करणार असेल तर मुंबईकरांना न्याय कोण देणार असाही सवाल राजा यांनी केला. मुंबईकरांच्या पैशाची दिवसाढवळ्या लूट सुरु आहे. महापालिका बरखास्त असल्यामुळे प्रशासक कोणालाच उत्तर द्यायला बांधील नाही अशी परिस्थिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून अशाप्रकारे होणारे गैरप्रकार थांबवावेत. एवढेच नाही तर ‘प्राईस एस्कलेशन’ चा जो पायंडा पाडला जात आहे तोही मोडीत काढावा, अशी विनंती राजा यांनी केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community