पद्मभूषण व महाराष्ट्र भूषण कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या साहित्याचा अमुल्य ठेवा जतन करून त्यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी शीव येथे त्यांचे स्मृती भवन बनवण्याची मागणी होत आहे. शीव येथे समाज कल्याण केंद्र तथा सांस्कृतिक केंद्र असे आरक्षण निश्चित करून यावर हे स्मृती भवन बनवण्याची मागणी प्रशासनाने अमान्य केल्याने या साहित्यिकांची दखलही महापालिकेला घ्यावीशी वाटत नाही का असा सवाल उपस्थित होत आहे.
मराठी माणसाच्या हृदयावर आजन्म राज करणारी अजरामर गाणी लिहून तसेच मराठीतील दर्जेदार कविता लिहून मराठी सारस्वतांच्या दरबारात आपल्या शब्दांच्या रत्नांची भर घालणारे पद्मभूषण व महाराष्ट्र भूषण कविवर्य मंगेश पाडगावकर हे शीव येथे वास्तव्यास होते. त्यांचे निधनही शीव येथील त्यांच्या राहत्या घरी झाले. पद्मभूषण व महाराष्ट्र भूषण कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे मराठी साहित्यातील योगदान मोठे आहेतच, शिवाय त्यांनी अन्य भाषांमधील अनेक दर्जेदार साहित्य अनुवादित करून मराठी साहित्यात भर घालण्याचे मोलाचे कामही केले.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना राज्याचा सर्वोच्च सन्मान असलेला पद्मभूषण व महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. अशा महनीय व्यक्तीचे वास्तव्य असलेला शीव परिसरात त्यांचे उचित असे स्मृतीभवन व्हावे अशी मागणी स्थानिकांसह मुंबईतील तमाम मराठी भाषा प्रेमी, साहित्यप्रेमींची इच्छा असल्याने स्थानिक माजी नगरसेविका राजेश्री राजेश शिरवडकर यांनी महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
(हेही वाचा – Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी)
या निवेदनात शिरवडकर यांनी आपल्या प्रभागातील भूखंड क्रमांक सीएस ४०१ ए/६ या भूखंडावर उचित स्मृती स्मृती भवन उभारुन त्यांचा सन्मान करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, हा भूखंड सुविधा भूखंड म्हणून राखीव असून त्या जागेवर सध्या कचरा संकलन केंद्र तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आले आहे. मात्र, स्थानिक नागरिक आणि साहित्य वर्तुळातील महनीय व्यक्तींच्या भावना लक्षात घेऊन मराठी भाषेची आणि मराठी माणसाची अस्मिता असलेल्या पद्मभूषण व महाराष्ट्र भूषण कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या भवनासाठी ही जागा देता येणार नाही असा अहवाल महापालिका प्रशासकीय विभागाने दिल्याची माहिती शिरवडकर यांनी देत याबाबत स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिकांसह मुंबईतील तमाम मराठी भाषा प्रेमी, साहित्यप्रेमींची इच्छा असल्याने त्यांच्या मागणीनुसार ही सूचना प्रशासनाला केली होती. मात्र, प्रशासनाची इच्छाच दिसत एकप्रकारे मराठी साहित्यिकाची सन्मानही महापालिका प्रशासनाला राखता येत नाही, अशा शब्दात नाराजी व्यक्त करत एकप्रकारे मराठी साहित्यप्रेमींमध्ये यामुळे प्रचंड नाराजी पसरली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community