पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी अधिक वाढणार! हे आहे कारण…

107

पश्चिम उपनगरातील अंधेरी, गोरेगाव व मालाडमधील अनेक पुलांची अवस्था दयनीय असून, भविष्यात पुलांमुळे दुघर्टना होऊ नये याची काळजी घेत महापालिकेच्या पूल विभागाने सहा पुलांच्या मोठ्या दुरुस्त्या आणि आठ पुलांच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. या तिन्ही प्रशासकीय विभागांमधील तब्बल १४ पुलांच्या कामांसाठी तब्बल १७.७५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. मुंबईत आधीच १८ पुलांच्या पुनर्बांधणीची कामे सुरु असून, यामुळे अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यातच आता आणखी सहा पुलांची भर पडणार आहे.

पुलांची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती

पश्चिम उपनगरातील परिमंडळ तीन आणि परिमंडळ चार मधील वाहतूक पूल, पादचारी पूल तसेच महापालिकेच्या हद्दीतील पादचारी पूल आदींची स्ट्रक्चरल सल्लागारांमार्फत तपासणी करण्यात आली होती. त्यानुसार काही ६ पुलांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती केली जाणार आहे. यामध्ये चार वाहतुकीचे आणि दोन पादचारी पुलांचा समावेश आहे. तर आठ पुलांची पुनर्बांधणी केली जाणार आहे. ज्यामध्ये दोन वाहतूक पुलांसह सहा पादचारी पुलांचा समावेश आहे. यासाठी महापालिकेने मागवलेल्या निविदांमध्ये स्वस्तिक कस्ट्रक्शन कंपनीने महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा उणे २२.४ टक्के कमी दर आकारुन कंत्राट मिळवले आहे. त्यामुळे या सर्व पुलांच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी  विविध करांसह १७ कोटी ७५ लाख ४६ हजार ३५२ रुपयांचे कंत्राट देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये तांत्रिक सल्लागार म्हणून टेक्नोजेम कंसल्टंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला तांत्रिक  सल्लागार शुल्क म्हणून ३३ लाख ३२ हजार रुपये व फेर तपासणी सल्लागार शुल्क म्हणून ९ लाख ३३ हजार एवढे शुल्क दिले जाणार आहे.

या पुलांच्या मोठ्या स्वरुपातील दुरुस्तीची कामे होणार

  • के / पूर्व विभागातील मिठी नदीवरील अंधेरी कुर्ला रस्त्यावरील वाहतूक पूल
  • के/पश्चिम विभागातील लोखंडवाला कॉम्प्लेक्स व लक्ष्मी इस्टेट यांना जोडणारा वाहतूक पूल
  • पी/उत्तर विभागातील अथर्व महाविद्यालय येथील हिंदूस्थान नाला मालाड चारकोप रस्त्यावरील वाहतूक पूल.
  • पी/उत्तर विभागातील लालजीपाडा वलनई पोईसर नदी व लिंक रोड पोईसर नदीवरील वाहतूक पूल.
  • मालाड (पूर्व) कुरार व्हिलेज येथील अनुराधा जनरल स्टोअर येथील पादचारी पूल
  • मालाड (पूर्व) कुरार व्हिलेज येथील गोकूळ नगर व आनंदनगर यांना जोडणारा पादचारी पूल.

( हेही वाचा :गृहिणींचं बजेट कोलमडलं! १५ किलोच्या खाद्यतेलाचा डबा ‘इतक्या’ रुपयांनी महागला)

या पुलांची होणार पुनर्बांधणी

  • के/ पश्चिम विभागातील कासम नगर येथे पादचारी पूलाची पुनर्बांधणी.
  • पी उत्तरमधील कुरार व्हिलेज, गांधीनगर येथील वाहतूक पूलाची पुनर्बांधणी
  • पी/उत्तर विभागातील पुष्पा पार्क येथील पादचारी पूलाची पुनर्बांधणी,
  • गोरेगांव (पू) येथे उत्तरेकडील रेल्वे पादचारी पुलाचे महानगरपालिका हद्दीमध्ये विस्तारीकरण.
  • पी/उत्तर विभागातील भूखंड क्र.१३ आणि ४ कलेक्टर कंपाऊंड, मालवणीमधील विद्यमान पादचारी पूलाची पुनर्बाधणी,
  • पी/उत्तर विभागातील मदर तेरेसा शाळेजवळ, कलेक्टर कंपाउंड, येथील विद्यमान पादचारी पूलाची पुनर्बांधणी.
  • पी/उत्तर विभागातील प्लॉट क्र. २५ आणि ८ बी, कलेक्टर कंपाउंड, मालवणी विद्यमान वाहन पूलाची पुनर्बांधणी.
  • पी/दक्षिण विभागातील संतोष नगर, गोरेगाव पूर्व येथील पादचारी पुलाची पुनर्बांधणी.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.