माहीम रेल्वे स्थानकाच्या शेजारील सेनापती बापट मार्गावर माहीम फाटकावर बांधण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामाचा खर्च तब्बल ६६ लाखांनी वाढला आहे. या कामासाठी यापूर्वी नेमलेल्या तांत्रिक सल्लागाराला बदलून नवीन सल्लागाराची नेमणूक केल्यानंतर त्यांनी आराखडे बदलल्याने हा खर्च वाढला. विशेष म्हणजे या पूलाच्या बांधकाम ट्युबलर सेक्शन ऐवजी प्लेट गर्डर बसवण्याचा निर्णय घेतला. तसेच प्रत्यक्ष जागेवर जिन्याचे बंधकाम करणे शक्य नसल्याने पादचारी पुलाचा जिना फॅब्रिकेशन यार्डमध्ये तयार करून नंतर तो साईटवर जोडला गेल्याने हा खर्च ६१ लाखांनी वाढला गेल्याने तांत्रिक सल्लागार नक्की कोणता सल्ला देतात असा प्रश्न उपस्थित होत असून सल्लागाराचे आडाखे चुकत असल्याने महापालिकेचा बांधकाम खर्चही वाढत असल्याचे दिसून येत आहे.
माहीम रेल्वे स्थानक येथील सेनापती बापट मार्गावरील पादचारी पूल बांधण्यासाठी महापालिकेच्यावतीने कुवाला कॉर्पोरेशन या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. कोविड पूर्वी म्हणजे २ जानेवारी २०१९ रोजी स्थायी समितीच्या मंजुरीने ३ कोटी ७७ नाख ३६ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. हा प्रस्ताव मंजूर करताना या पुलाच्या बांधकामासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून कंपोझीट कंबाईन टेक्नोक्रॅट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली होती. परंतु पुढे महापालिकेने या कंपनीला बाजुला करून कन्सटु्मा कन्सल्टंसी या कंपनीची तांत्रिक सल्लागार म्हणून नेमणूक केली.
(हेही वाचा कर्नाटकात मुसलमानांचे आरक्षण रद्द; बोम्मई सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचा निर्णय )
महापालिकेच्या पूल विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कंपोझिट कंबाईन टेक्नोक्रॅट्स या कंपनीची पुलाच्या बांधकामात तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली असली तरी यासाठी आवश्यक असलेले आरखडे ते निश्चित कालावधीत देऊ शकले नाही. त्याकरता त्यांना वारंवार आठवण व स्मरणपत्रे पाठवूनही ते आरखडा देण्यात असमर्थ ठरले. त्यामुळे उपायुक्त (पायाभूत सुविधा) यांच्या मंजुरीने कंपोझिट कंबाईन ऐवजी कंन्सट्रुमा कन्सल्टंसी या कंपनीची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. कंपोझिट कंबाईन सोबत करार निश्चित वेळेपूर्वी संपुष्टात आणण्यापूर्वी या कंपनीला ३ लाख ४१ हजार ६१७ रुपयांचे सल्लागार शुल्क अदा केले. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा सल्ला न देणाऱ्या या कंपनीला तब्बल साडेतीन लाखांची रक्कम देण्याऐवजी त्यांना काळ्या यादीत टाकण्याची कोणतीही कारवाई महापालिकेच्यावतीने करण्यात आली नाही.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या पुलाचे बांधकाम ट्युबलर सेक्शनद्वारे करण्यात येते. परंतु हिमालय पूल दुघर्टनेनंतर ट्युबलर ऐवजी प्लेट गर्डरद्वारे या पुलाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच हे काम प्लेट गर्डर स्ट्रक्चरल द्वारे करण्याचे काम सुरु असतानाच पायलिंगचे बांधकाम करताना पावसाळी पाणी वाहून नेणारी वाहिनी अर्थात पर्जन्य जलवाहिनी बाधित होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही पर्जन्य जलवाहिनी वळवण्यात आली. तसेच पादचारी पूल हा ३६ मीटरचा सिंगल स्पॅन गर्डर असून सेनापती बापट मार्गावर वाहतुकीची वर्दळ असल्याने तसेच मोरी रोड जंक्शन या चौकांमध्ये पिलरचे बांधकाम केल्यास वाहतुकीच्या दृष्टीने शक्य नसल्याने गर्डरची खोली वाढली. त्यामुळे बांधकामाची सुरक्षा व स्थिरता विचारात घेता तांत्रिक सल्लागाराने अतिरिक्त ब्रेसिंग्स, एलॅस्टोमेरि बेअरींगची जाडी, एच डी बोल्ट्सच्या प्रमाणात वाढ केली. तसेच जिना आणि सेल्फ सर्पोर्टींग कॉलम्सची गुणवत्ता राखण्यासाठी सुपर स्ट्रक्चरल डिझाईननुसार काम करणे गरजेचे होते. त्यामुळे तांत्रिक सल्लागार कन्स्ट्रुमा कन्सल्टंसी या कंपनी सुचवलेल्या सुधारणांचा समावेश केल्याने कामाच्या स्वरुपात आणि किंमतीत वाढ झाल्याने तब्बल ६१लाख रुपयांचा खर्च वाढल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ३.७७ कोटी रुपयांऐवजी हा खर्च ४.४४ कोटी एवढा या पुलाच्या बांधकामाचा खर्च पोहोचला आहे.
Join Our WhatsApp Community