महात्मा ज्योतिबा फुले मंडईतील अर्थात क्रॉफर्ड मार्केटचे नुतनीकरण करण्यात आल्यानंतर यातील गाळेधारकांना आता ६५ हजार ते १ लाख रुपये शुल्क भरण्याच्या नोटीस जारी केल्या आहे. गाळेधारकांना जे नवीन गाळे बांधून दिले आहे, त्याचा खर्च आता त्या परवानाधारकांकडून वसूल केला जात आहे. त्यामुळे आपल्याच परवानाधरकांकडून अशाप्रकारे गाळ्यांचा खर्च वसूल करणे हे योग्य नसून नोटीसना त्वरीत स्थगिती देण्याची मागणी बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे.
खर्च वसुलीला त्वरीत स्थगिती देण्याची काँग्रेस नगरसेविकेची मागणी
बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत काँग्रेस नगरसेविका सोनम मनोज जामसूतकर यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे या बाजार विभागाच्यावतीने गाळेधारकांना आकारण्यात आलेल्या गाळ्यांच्या खर्चाबाबत समितीचे लक्ष वेधून घेतले. क्रॉफर्ड मार्केटच्या नुतनीकरणाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरु असून हेरिटेज वास्तूतील गाळ्यांचे नुतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या गाळेधारकांना जुलै २०२० रोजी नोटीस जारी करण्यात आले आहे. या नोटीस नुतनीकरण केलेल्या गाळ्यांचे लॉफ्ट व रोलिंग शटर अर्थात केबिन यांच्या चौरस फुट दराने भाडे व अधिमुल्य वसूल करण्यासाठी जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक गाळेधारकांना ६५ हजार ते १ लाखांचे शुल्क भरण्याच्या नोटीस जारी करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा : बृहन्मुंबई क्रिडा व ललित कला प्रतिष्ठानच्या तिजोरीत खडखडाट!)
सर्व गाळे चालक हे परवानाधारक!
कॉफ्रर्ड मार्केटमधील हे सर्व गाळे चालक हे परवानाधारक असून यापूर्वी त्यासर्वांचे गाळे हे सुस्थितीत होते. प्रत्येक गाळेधारकांनी आपल्या गाळ्यांवर एक ते चार लाखांपर्यंतचा खर्च केला होता. परंतु महापालिकेने याचे नुतनीकरण करताना हे सर्व गाळे तोडून टाकून एकाच आकारामध्ये या गाळ्यांची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे या नवीन गाळ्यांकरता त्यांच्याकडून आता खर्च वसूल केला जात असून अशाप्रकारे कोणत्या मार्केटमधील गाळेधारकांकडून गाळ्यांचा खर्च वसूल केला होता, असा सवाल करत अशाप्रकारे वसूल करण्यात येणाऱ्या खर्चाला त्वरीत स्थगिती द्यावी व यापुढे या खर्चाचे पैसे वसूल करु नये, अशी मागणी जामसूतकर यांनी केली. त्यामुळे अखेर बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा चंद्रावती मोरे यांनी हा मुद्दा राखून ठेवला.
Join Our WhatsApp Community