जमिनीचा तळ न लागल्याने दवाखान्याचा खर्च ९२ लाखांनी वाढला!

सल्लागारांच्या अभिप्रायानुसार पायलिंग प्रकारचा पाया या दवाखान्याच्या बांधकामासाठी करावा लागला असल्याची बाब समोर आली आहे.

एच-पश्चिम येथील खार पश्चिम येथील दवाखान्याचे काम पाच वर्षे होत आली तरी पूर्ण झालेली नाही. विशेष म्हणजे दवाखान्याचे काम हाती घेतल्यानंतर तळच न सापडल्याने याचा खर्च तब्बल ९२ लाखांनी वाढला गेला. आजवर कोणतेही बांधकाम हाती घेतल्यानंतर त्याचा तळ गाठून पुढील कामाला सुरुवात केली. पण या दवाखान्याच्या कामाला सुरुवात केल्याचा त्या अपेक्षित क्षमतेचा भूस्तर न आढळल्याने पुन्हा मृदा चाचणी करावी. त्यामुळे सल्लागारांच्या अभिप्रायानुसार पायलिंग प्रकारचा पाया या दवाखान्याच्या बांधकामासाठी करावा लागला असल्याची बाब समोर आली आहे.

पायलिंग प्रकारचा पाया

खार पश्चिम येथील एस.व्ही. रोड समोरील ३४व्या रोडवरील जुन्या खार दवाखान्याच्या पुनर्विकासाचे काम ३ नोव्हेंबर २०१७ रोजी हाती घेण्यात आले. हे काम पावसाळ्यासहित १८ महिन्यांत करणे आवश्यक होते. याकरता अनस इन्फ्रा कंपनीला ८ कोटी ४८ लाख ९० हजारांचे कंत्राट देण्यात आले होते. १८ महिन्यांच्या कालावधीत हे मे २०१९पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. पण त्यानंतर या कामाचा कालावधी वाढवण्यात आला. त्यामुळे हे काम २५ एप्रिल २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. पण इमारतीच्या पायाचे काम चालू असताना इमारतीच्या ज्योत्याच्या अर्ध्या भागात सुमारे सात मीटर खोदकाम करुनही अपेक्षित क्षमतेचा भूस्तर आढळून आला नाही. त्यामुळे पुन्हा मृदा चाचणी करण्यात आली. त्या मृदा चाचणी अहवालानुसार, त्या अर्ध्या भागात संरचना सल्लागाराच्या अभिप्रायनुसार पायलिंग प्रकारचा पाया या इमारतीसाठी करणे भाग पडले. अशी अपवादात्मक परिस्थिती एखाद्या कामात उद्भवू शकते, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार इमारतीच्या बांधकामात बदल करण्यात आला असून, पुढील काम सुरू आहे. आतापर्यंत तळ अधिक सहा मजल्यांचे काँक्रिटचे काम पूर्ण झाले आहे.

(हेही वाचाः मराठी माध्यमातून दहावी शिकले, म्हणून होत नाही ‘त्या’ शिक्षकांची नियुक्ती!)

कंत्राटाची मूळ किंमत वाढली

इमारतीच्या पायामध्ये व बांधकामामध्ये ऐनवेळी कराव्या लागत असलेल्या बदलांमुळे कंत्राटाचा खर्च वाढला असल्याचे आरोग्य पायाभूत सुविधा कक्षाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अतिरिक्त फाऊंडेशन व त्या अनुषंगाने केलेले बांधकाम यामुळे अंदाजपत्रकातील किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे अतिरिक्त काम पूर्ण करण्यासाठी ९१ लाख ९९ हजार ७७९ रुपयांची गरज आहे. त्यामुळे मूळ कंत्राट किंमत ८ कोटी ४८ लाख ९० हजार २३१ रुपयांवरून वाढून ९ कोटी ४० लाख ९० हजार १० रुपयांपर्यंत वाढली आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here