मुंबईतील जंबो कोविड सेंटरमधल्या ऑक्सिजन प्लांटचा खर्च झाला कमी

चार टप्प्यांमधील एक टप्पा पूर्णपणे तर एक टप्पा अंशत: कमी करुन, १३ जंबो कोविड सेंटरमध्ये हे प्लांट उभारले जाणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या विशेष आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम यापूर्वी देण्यात आल्यानंतर, आता सर्व जंबो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत. या प्लांटच्या ३२५ कोटी रुपयांच्या कंत्राट कामांसाठी मागवलेल्या निविदेतील खर्चाचा आकडा कमी झाला असून, हे काम अवघ्या २०५ कोटी रुपयांमध्ये होणार आहे. चार टप्प्यांमधील एक टप्पा पूर्णपणे तर एक टप्पा अंशत: कमी करुन, १३ जंबो कोविड सेंटरमध्ये हे प्लांट उभारले जाणार आहेत.

या कंपन्या ठरल्या पात्र

महापिलकेच्या विविध जंबो कोविड आरोग्य केंद्रांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यासाठी महापालिकेने चार टप्प्यांमध्ये निविदा मागवल्या होत्या. या चार टप्प्यांसाठी दोन कंत्राटदार पात्र ठरले असून, त्यांना प्रत्येकी दोन टप्प्यांचे काम मिळाले होते. परंतु अनेक ऑक्सिजन प्लांट हे सीएसआर निधीतून बनवण्यात आल्याने निविदेनंतर प्रस्तावित कामांमधून ही कामे वगळण्यात आली. त्यामुळे पहिल्या व तिसऱ्या टप्प्यांच्या कामांसाठी हाय-वे कंन्स्ट्रक्शन आणि दुसऱ्या टप्प्यांच्या कामांसाठी जी.एस.एन.असोशिएट्स या कंपन्या पात्र ठरल्या आहेत. परंतु पूर्ण चौथा टप्पा व तिस-या टप्प्यातील काही कामे ही सीएसआर निधीतून केल्याने रद्द करण्यात आली आहेत.

(हेही वाचाः ऑक्सिजन प्लांट उभारणी: सीएसआर निधी रुग्णालयांमध्ये, महापालिकेचा निधी कोविड सेंटरमध्ये)

खर्च झाला कमी

त्यामुळे पहिल्या टप्पातील ६६. ८४ कोटींच्या कामांसाठी हाय-वे कंस्ट्रक्शन आणि दुसऱ्या टप्प्यातील ८०.७० कोटींच्या कामांसाठी जी.एस.एन असोशिएट्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील कामांसाठी हाय-वे कंस्ट्रक्शन कंपनीची निवड झालेली असली, तरी या कामांसाठी वाटाघाटीनंतर हे काम जीएसएन कंपनीकडून करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. या तिसऱ्या टप्प्यातील अंशत: कामांसाठी ५७.७४ कोटी रुपयांचे कंत्राट जीएसएन असोशिएट्स या कंपनीला देण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ३२५ कोटी रुपयांच्या कामांसाठी मागवलेल्या कामांचा खर्च अनेक कामे वगळल्याने कमी झाला असून, आता केवळ २०५ कोटी रुपयांवर आला आहे. या सर्व ठिकाणी १ लाख ३ हजार लि.प्र.मि क्षमतेच्या प्लांटची उभारणी केली जाणार आहे.

कोणत्या जंबो कोविड सेंटरमध्ये निर्माण होणार प्लांट

 • वरळी एन.एन.सी. आय
 • दहिसर कांदरपाडा
 • वरळी पोद्दार रुग्णालय
 • शीव के.जे. सोमय्या मैदान
 • बी.के.सी. फेज १
 • बी.के.सी. फेज २
 • दहिसर चेक नाका
 • गोरेगाव नेस्को
 • कांजूरमार्ग
 • मुलुंड रिचर्डसन व क्रुडास
 • मालाड
 • महालक्ष्मी रेसकोर्स
 • भायखळा रिचर्डसन व क्रुडास

(हेही वाचाः मुंबईतून रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना हद्दपार करण्याचा डाव?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here