मुंबईत देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी लवकरच धावणार; मंत्री Nitesh Rane यांचा विश्वास

43
मुंबईत देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी लवकरच धावणार; मंत्री Nitesh Rane यांचा विश्वास
  • प्रतिनिधी

मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता लवकरच संपणार असून, देशातील पहिली पर्यावरणपूरक ई-वॉटर टॅक्सी मुंबईच्या जलमार्गावर धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी या सेवेचा पायलट प्रोजेक्ट राबवणार असून, ही सेवा तातडीने सुरू करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी स्वीडनचे महावाणिज्य दूत स्वेन ओस्टबर्ग यांना दिल्या आहेत. मंत्रालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत या संदर्भात सविस्तर चर्चा झाली.

बैठकीतील चर्चा आणि निर्णय

मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी स्वीडनचे महावाणिज्य दूत स्वेन ओस्टबर्ग यांच्यासोबत मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी ओस्टबर्ग यांच्या सल्लागार सलोनी झव्हेरी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ई-वॉटर टॅक्सी प्रकल्पाला गती देण्यावर भर देण्यात आला. मंत्री राणे यांनी सांगितले की, मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी ही मोठी समस्या बनली असून, या समस्येवर मात करण्यासाठी ई-वॉटर टॅक्सी हा प्रभावी पर्याय ठरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकल्पाला लवकर सुरुवात व्हावी, यासाठी आग्रह धरला आहे.

(हेही वाचा – IPL 2025 : आयपीएलमध्ये शार्दूल ठाकूर जखमी मोहसीन खान ऐवजी लखनौ सुपरजायंट्सच्या ताफ्यात दाखल)

पायलट प्रोजेक्टचे स्वरूप

ई-वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग या जलमार्गांवर राबवला जाणार आहे. या सेवेमुळे मुंबईला भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. स्वीडनच्या कँडेला कंपनीला नागरिकांची सुरक्षितता, पर्यावरण संरक्षण आणि वातावरणाचा विचार करून हा प्रकल्प राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, वॉटर टॅक्सीचे दर सर्वसामान्यांना परवडतील असे माफक ठेवावेत आणि कंपनीला लागणाऱ्या परवान्यांसाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही राणे (Nitesh Rane) यांनी स्पष्ट केले.

स्वीडनच्या कंपनीचे योगदान

महावाणिज्य दूत स्वेन ओस्टबर्ग यांनी महाराष्ट्रातील बंदरांच्या विकासात स्वारस्य दाखवले. ते म्हणाले, “स्वीडनची कँडेला कंपनी लवकरच मुंबईत येऊन या प्रकल्पाबाबत सर्व माहितीचे सादरीकरण करेल. त्यानंतर पायलट प्रोजेक्ट त्वरित सुरू करण्यात येईल.” त्यांनी पोर्टच्या विकासाबाबतही स्वीडनच्या कंपन्या योगदान देण्यास उत्सुक असल्याचे नमूद केले आणि यासंदर्भात चर्चा पुढे नेण्याचे आश्वासन दिले.

(हेही वाचा – “संजय राऊतांनी मानसोपचार घ्यावेत, सरकार सर्व खर्च करेल” ; CM Devendra Fadnavis यांची टीका)

ससून डॉकला मॉडेल पोर्ट बनवण्याचा प्रस्ताव

मंत्री राणे (Nitesh Rane) यांनी ससून डॉकला देशातील एक नंबरचे मॉडेल पोर्ट बनवण्याचा प्रस्ताव मांडला. “स्वीडनच्या कंपन्यांनी राज्य शासनाला पोर्ट विकासाबाबत ठोस प्रस्ताव सादर करावा. वाहतुकीसाठी सुलभ ठिकाणांची पाहणी करून एक आदर्श पोर्ट विकसित करावे,” असे त्यांनी सांगितले. यासाठी मेरीटाइम बोर्डाशी चर्चा करून एप्रिल महिन्यात पाहणी पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ओस्टबर्ग यांनी पोर्टच्या स्वच्छतेसह सोयी-सुविधा आणि गुंतवणुकीबाबत माहिती दिली.

मुंबईसाठी नवे पर्व

ई-वॉटर टॅक्सीच्या या प्रकल्पामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडणार असून, पर्यावरणपूरक आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास देशातील इतर शहरांसाठीही तो प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुढील काही महिन्यांत या प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.