- ऋजुता लुकतुके
किरकोळ महागाई दर ६ टक्क्यांच्या आत राखणं रिझर्व्ह बँकेला यंदा शक्य होणार नाही असा अंदाज एका सर्वेक्षणात अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याचा दुसरा अर्थ असा की, देशात अन्न धान्याच्या किमती आणखी काही काळ चढ्या राहणार आहेत. देशाचा किरकोळ महागाई दर जून महिन्यात ६.४ टक्क्यांवर पोहोचेल असा अंदाज देशातील अर्थतज्ज्ञांनी एका सर्वेक्षणात व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकेनं महागाई दर २ ते ६ टक्क्यांमध्ये सिमित ठेवण्याचं उद्दिष्टं ठेवलं आहे. पण, जून महिन्यात महागाई मर्यादे पलीकडे वाढणार अशीच चिन्ह आहेत. येत्या १४ ऑगस्टला महागाईचे आकडे जाहीर होणार आहेत.
मागच्या दोन महिन्यात देशात अन्नधान्याच्या किमती १०० टक्क्यांनी वाढल्या आहेत. एकट्या टोमॅटोचे भाव तर मागच्या तीन महिन्यांत १४०० टक्क्यांनी वाढले. अनियमित पाऊस आणि शेतात पडलेली कीड यामुळे ही परिस्थिती ओढवली असली तरी महागाई दर मोजताना निम्म्याहून जास्त हिस्सा हा अन्नधान्यातील किमतींचा असतो. त्यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढल्या तर महागाई दर वाढणार हे निश्चित आहे. रॉयटर्स या संस्थेनं देशातील ५३ अर्थतज्ज्ञांना महागाईच्या दराविषयीचा त्यांचा अंदाज विचारला. आणि त्याची सरासरी काढून त्यांनी एक अहवाल बनवला आहे. ५३ पैकी ३/४ अर्थतज्ज्ञांनी महागाई दर रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेली मर्यादा मोडेल असाच निर्वाळा दिला. यातल्या काहींच्या मते हा दर ७ टक्क्यांच्या वरही असू शकतो. महत्त्वाचं म्हणजे येत्या दोन महिन्यात वस्तूंच्या किमती आटोक्यात येतील असं यातल्या कुणालाही वाटत नाहीए.
(हेही वाचा – Pune : पुण्यातील तरुणीची फसवणूक; मुंबईच्या फौजदारासह चार जणांवर गुन्हा दाखल)
या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या एका अर्थतज्ज्ञांचं मत रॉयटर्सने आपल्या अहवालातही दिलं आहे. एसोसिएट जनरल संस्थेचे भारतीय तज्ज्ञ कुणाल कुंडू यांच्या मते, ‘अशा प्रकारे आलेली महागाई तीन ते चार महिने टिकते. आणि त्याचे परिणाम निदान तीन महिने अर्थव्यवस्थेला जाणवत राहतात. पण, नंतरच्या काळात अशी तात्कालिक कारणांनी निर्माण झालेली महागाई झपकन खालीही येते.’ दरम्यान केंद्र सरकारने अन्नधान्याच्या महागाईवर तातडीने उपाययोजना सुरू केली आहे. नेपाळमधून टोमॅटो आयात करण्यात येत आहे. तर तांदूळ, गहू, साखर यांसारख्या मुख्य उत्पादनांच्या निर्यातीवरही केंद्राचं विशेष लक्ष आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community