बोरीवली पश्चिम येथील एस व्ही रोडवरील पुलाचे बांधकाम तोडून त्याठिकाणी नव्याने बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावरील कल्व्हर्टचे बांधकाम जुने मोडकळीस आल्याने ते तोडून त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार असून यासाठी सुमारे ७ कोटी ०७ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.
बोरीवली पश्चिम येथील एसव्ही रोडवरील कल्याण ज्वेलर्स जवळील कल्व्हर्ट जुने झाल्याने २०१९मध्ये स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले होते. यावेळी तांत्रिक सल्लागाराने या कल्व्हर्टची दुरुस्ती करण्याची शिफारस केली होती. या कल्व्हर्टची खोली पुरेशी नसल्याने दुरुस्तीचे काम करणे शक्य नसल्याने मोडकळीस आलेले कल्व्हर्ट पाडून त्याच ठिकाणी पुनर्बांधणी करण्याचा विचार केला गेला. त्यामुळे पश्चिम उपनगरातील पुलांच्या स्ट्रक्चरल ऑटीटसाठी नेमलेल्या एससीजी कन्सल्टंन्सी सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून पुन्हा या कल्व्हर्ट पुलाची तपासणी करण्यात आली. यामध्ये या कल्व्हर्ट पुलाचे बांधकाम मोडकळीस आल्याने तसेच वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याने या पुलाची पुनर्बांधणी करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या पुलाच्या बांधकामासाठी आराखडा बनवण्यासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून टीपीएफ इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली.
त्यानुसार मागवलेल्या निविदेमध्ये जैन कन्स्ट्रक्शन ही कंपनी पात्र ठरली असून पावसाळा वगळून १२ महिन्यांमध्ये या कल्व्हर्टचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे.यासाठी ७ कोटी ०७ लाख् रुपये खर्च केला जाणार आाहे. तर तांत्रिक सल्लागार म्हणून नेमलेल्या टीपीएफ इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला १९ लाख ५० हजार ६७८ रुपये शुल्क दिले जाणार आहेत. या निविदेमध्ये तब्बल ९ कंपन्यांनी भाग घेतला होता.
Join Our WhatsApp Community