प्राणवायूच्या दैनंदिन पुरवठ्यावर गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून होणार देखरेख

मुंबईतील सर्व रुग्णालयांना विशेषतः खासगी रुग्णालयांना उपलब्ध ऑक्सिजन साठ्याचा सुयोग्य आणि काटकसरीने वापर करण्याच्या सक्त सूचना करण्यात आल्या आहेत.

महानगरपालिकेच्या व सर्व खासगी रुग्णालयांमध्ये प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी दैनंदिन प्राणवायू वितरण प्रणालीमध्ये अचूकता राखण्यासाठी गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. याबाबत महानगरपालिका प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत.

व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे आढावा बैठक घेतली!

मुंबई महानगरपालिकेच्या ६ रुग्णालयांतील १६८ रुग्णांना शनिवार, १७ एप्रिल, २०२१ रोजी प्राणवायू उपलब्ध होवू न शकल्याने महानगरपालिका रुग्णालये आणि समर्पित कोरोना आरोग्य केंद्रांमध्ये सुरक्षितरित्या स्थलांतरित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर, प्राणवायू पुरवठ्यासंदर्भात प्रणालीमध्ये अधिक सुसूत्रतता व समन्वय साधण्यासाठी महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सोमवारी, १९ एप्रिल २०२१ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे आढावा बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, पी. वेलरासू, सुरेश काकाणी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्यासह महानगरपालिकेचे विविध सह आयुक्त, उप आयुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता तसेच वैद्यकीय अधीक्षक आणि अन्न व औषध प्रशासनाचे इतर अधिकारी, विविध प्राणवायू उत्पादक तसेच पुरवठादार या बैठकीत सहभागी झाले होते.

(हेही वाचा : मुंबईत केवळ १८ दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचा आजवरचा सर्वाधिक आकडा! मृत्यूही वाढले)

दररोज प्राप्त होणाऱ्या प्राणवायूची माहिती गुगल ड्राईव्हमध्ये अद्ययावत!

कोविड रुग्णांसाठी प्राणवायूची गरज सर्वत्र निर्माण झाली असून मुंबई त्याला अपवाद नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनासह प्राणवायू उत्पादक व पुरवठादार यांच्यावर असलेला ताण समजण्यासारखा आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मुंबईसाठी सध्या प्रतिदिन देण्यात येत असलेला २३५ मेट्रिक टन प्राणवायू साठा कमी करण्यात येऊ नये. प्राणवायू उत्पादन स्थळापासून त्याची वाहतूक आणि मुंबईतील सर्व कोरोना रुग्णालये व कोरोना केंद्र तसेच इतर रुग्णालयांमध्ये देखील त्याचे वितरण होईपर्यंतच्या सर्व बाबींवर देखरेख करण्यासाठी महानगरपालिकेची पथके नेमण्यात येतील. ही पथके रुग्णालयांना दररोज प्राप्त झालेला प्राणवायू साठा किती त्याची माहिती गुगल ड्राईव्हमध्ये अद्ययावत करतील. त्यामुळे दररोज किती प्राणवायू मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपलब्ध होतो, त्यावर देखरेख करता येईल, अशी सूचना चहल यांनी केली. त्यावर सहमती दर्शवत अन्न व औषध प्रशासन आयुक्त. काळे यांनी सांगितले की, या कामी महानगरपालिकेच्या यंत्रणेला अन्न व औषध प्रशासनाकडून देखील आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल.

मिशन मोडवर काम करा!

मुंबईतील सर्व रुग्णालयांना विशेषतः खासगी रुग्णालयांना उपलब्ध ऑक्सिजन साठ्याचा सुयोग्य आणि काटकसरीने वापर करण्याच्या सक्त सूचना करण्यात आल्या आहेत. विशाखापट्टणम, जामनगर आणि रायगड या तिन्ही ठिकाणांहून मिळून सुमारे ५०० टन अधिकचा प्राणवायू साठा लवकरच उपलब्ध होण्याची अपेक्षा असून त्यानंतर सर्वांनाच दिलासा मिळेल. परंतु, तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणेसह प्राणवायू उत्पादक आणि पुरवठादार यांनी देखील ‘मिशन मोड’ वर काम करावे, महानगरपालिकेने नेमलेल्या समन्वय अधिकाऱ्यांसमवेत मिळून सर्व विभागातील रुग्णालयांना वेळेवर प्राणवायू साठा पुरवावा. प्राणवायूच्या कमतरतेमुळे कोणताही अनुचित प्रसंग ओढवणार नाही, याची दक्षता घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे निर्देशही चहल यांनी यावेळी दिले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here