मंडप उभारण्यात आलेल्या गणेश मूर्तीकारांना मिळणार रक्कम

ज्या गणेश मूर्तीकारांकडून मंडप उभारणीसाठी रक्कम स्वीकारली होती, त्यांना येत्या अनंत चतुर्दशीनंतर ती परत केली जाणार आहे.

70

कोविडच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणाऱ्या शुल्कांमध्ये सवलत तसेच सूट देण्यात येत असताना, गणेश मूर्तीकारांकडून मंडप उभारणीसाठी शुल्क तसेच अनामत रक्कम स्वीकारण्यात आली होती. परंतु आता हे शुल्क आणि अनामत रक्कम यावर्षी कोविडमुळे माफ करण्यात आली आहे. शुल्क आणि अनामत रक्कमेमध्ये पूर्णत: सूट देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून, ही रक्कम ज्या गणेश मूर्तीकारांकडून मंडप उभारणीसाठी स्वीकारली होती त्यांना येत्या अनंत चतुर्दशीनंतर ती परत केली जाणार आहे. त्यामुळे गणेश मूर्तीकारांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

(हेही वाचाः पाच दिवसांमध्ये मुंबईत इतक्या बाप्पांना निरोप)

आयुक्तांनी दिली प्रस्तावाला मंजुरी

कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे गणेश मूर्तीकार आर्थिक संकटात असल्याने त्यांना मंडप उभारणीस परवानगी देताना आकारण्यात येणारे शुल्क आणि अनामत रक्कम माफ करावी, अशी मागणी मुंबई गणेश मूर्तीकार संघाने १० ऑगस्ट २०२१ रोजी परिमंडळ दोनचे उपायुक्त हर्षद काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केली होती. सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई गणेश मूर्तीकार संघ, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, तसेच मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या प्रतिनिधींसोबत ही बैठक पार पडली. यावेळी मूर्तीकार संघाने केलेल्या मागणीनुसार परिमंडळ दोनचे उपायुक्त हर्षद काळे यांनी मूर्तीकारांच्या मंडपांना आकारण्यात येणारे शुल्क व अनामत रक्कम माफ करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मंजुरीसाठी सादर केला होता. त्याला आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.

(हेही वाचाः फेरीवाला धोरणाला आला नवा पर्याय! जाणून घ्या कोणता?)

खात्यात जमा होणार रक्कम

मूर्तीकारांकडून स्वीकारण्यात येणारे शुल्क व अनामत रक्कम यामध्ये पूर्णत: सूट देण्यात येत आहे. त्यामुळे यापूर्वी विभाग कार्यालयाकडून मूर्तीकारांच्या मंडपाबाबत आकारण्यात आलेले शुल्क व अनामत रक्कम याचा परतावा संबंधितांना देण्यात यावा, असे परिपत्रकच उपायुक्तांनी जारी केले आहे. महापालिकेच्या विभाग कार्यालयांकडे प्रत्येक मंडळांचे बँक खाते असून, त्यानुसार ही रक्कम मूर्तीकारांच्या खात्यामध्ये पाठवली जाईल, अशीही माहिती मिळत आहे. याबाबत परिमंडळ दोनचे उपायुक्त व सार्वजनिक उत्सवाचे समन्वय हर्षद काळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आयुक्तांच्या मान्यतेनंतर गणेश मूर्तीकारांच्या मंडपांना आकारण्यात आलेले शुल्क व अनामत रक्कम यावर्षी माफ करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे संबंधित विभाग कार्यालयांना ही रक्कम गणेश मूर्तीकारांना परत देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असून, अनंत चतुर्दशीनंतर ही रक्कम त्यांना परत दिली जाईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.