मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीने एकूण ५० शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी या पुरस्कार विजेत्या शिक्षकांच्या नावांची घोषणा करून लवकरच या शिक्षकांना समारंभपूर्वक गौरवण्यात येईल,असे शिक्षण विभागाने जाहीर केले होते. परंतु दीड महिना उलटला तरी प्रशासनाला या पुरस्काराच्या वितरणाची तारीख जाहीर करता आली नाही की त्याचे वाटप करता आले नाही.
शिक्षण विभागातील महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित व विना-अनुदानित प्राथमिक शाळांमधील जे शिक्षक ज्ञानदानाचे व विद्यार्थी घडवण्याचे पवित्र कार्य प्रामाणिकपणे करत आहेत, त्यांचा यथोचित गौरव करण्याची परंपरा सन १९७१ पासून ०२ शिक्षकांना पुरस्कृत करुन सुरु झाली. त्यानंतर वेळोवेळी यामध्ये बदल होऊन आजमितीस ५० आदर्श शिक्षकांना “महापौर पुरस्काराने” गौरवण्यात येते. परंतु यंदा ७ मार्च रोजी महापालिकेची मुदत संपुष्टात आली. संविधानिक कारणास्तव यावर्षी महापौर हे पद रिक्त आहे. मात्र, ५० वर्षांची परंपरा खंडित होऊ नये म्हणून हे पद रिक्त असूनही त्याच नावाने हा पुरस्कार देणे संयुक्तिक असल्याने महापलिका शिक्षण विभागाने हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा दिनांक ०५ सप्टेंबर हा जन्मदिवस आहे. त्यांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून या दिवशी “आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने” महानगरपालिकेच्या शिक्षकांना दरवर्षी सन्मानित करण्यात येते. सन २०२१-२२ च्या पुरस्कारासाठी आदर्श शिक्षकांची निवड करण्यासाठी महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित व विना-अनुदानित प्राथमिक शाळांतील एकूण १०३ शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून ५० आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
( हेही वाचा: प्रवीण दरेकर यांना मुंबै बॅंक घोटाळा प्रकरणात क्लीन चिट )
महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व विना-अनुदानित प्राथमिक शाळांतील आदर्श आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे व्रत स्वीकारलेल्या या ५० शिक्षकांना प्रत्येकी रुपये १० हजार (इसीएस द्वारे बँकेत जमा), मुंबई महानगरपालिका मानचिन्हाचे सोन्याचा मुलामा दिलेले पदक, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व फेटा देऊन मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या हस्ते लवकरच सन्मानित केले जाईल असे जाहीर केले होते. परंतु पुरस्काराची घोषणा करून दीड महिना उलटला तरी प्रशासनाला या पुरस्काराचे वितरण करायला मुहूर्तच सापडत नाही.
Join Our WhatsApp Community