विलेपार्ले पूर्वेतील रेल्वे स्थानकाजवळील अंदाजे साठ वर्ष जुने पिंपळाचे झाड खोडासह छाटल्याप्रकरणी विरोध दर्शवणा-या पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्याला पोलिसांनी थेट उचलून पोलिस ठाण्यात डांबले. तीन तासांनी कार्यकर्त्याची सुटका झाली असली तरीही या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ आता समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. वृक्ष छाटणीला विरोध केला परंतु कोणतीही हिंसा केली नाही, तरीही पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवत कार्यकत्याची धरपकड करुन तुरुंगात डांबल्याच्या प्रकरणाचा सर्वच स्तरांतून निषेध होत आहे.
अखेर पोलिसांनी मागितली माफी
शनिवारी विलेपार्ले येथील पूर्वेकडील रेल्वे स्थानकाजवळ संबंधित पालिका वॉर्ड अधिका-यांकडून पिंपळाचे झाड कापले जात होते. ही माहिती मिळताच पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते अभय बावीशी यांनी या ठिकाणाला भेट दिली. या झाडाला कापण्याची ऑर्डर २०१८ साली दिली गेली होती, अशी माहिती वॉर्ड अधिका-यांनी बावीशी यांना दिली. हे झाड कापू नका, असे आपण २०१७ सालापासून पालिकेला पत्र लिहित आहोत. यासंदर्भातील नागरिकांना माहिती देणारी नोटीसही दिली गेली नाही, थेट झाड कसे कापले, असा प्रश्न विचारल्यानंतर ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी बावीशी यांची रवानगी पोलिस ठाण्यात केली. त्याबाबत बावीश यांना पोलिस गाडीत डांबल्याचा व्हिडिओ आता सर्क्युलेट होत आहे. घटनेच्या निषेधार्थ कित्येक वृक्षप्रेमींनी समाजमाध्यमांवर मुंबई पोलिसांचा निषेध केला. अखेर मुंबई पोलिसांनीही संबंधित पोलिसांच्या गैरवर्तनाबाबत ट्विटर समाजमाध्यमावर दिलगिरी व्यक्त केली.
(हेही वाचा वेत्ये-तिवरे किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवांची आणखी अंडी)
Join Our WhatsApp Community