नालेसफाई की मुंबईकरांशी ‘बेवफाई’?

पहिल्याच पावसात मुंबईत साचलेल्या पाण्याने महापालिकेच्या व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचल्याने मुंबईची तुंबई होते. या वर्षी मोठ्या नाल्यांची 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासन आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला होता. मात्र हा दावा आज फोल ठरला आहे. रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने बुधवारी मुंबईच्या सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

व्यवस्थेचा बोजवारा

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर मुंबईसह इतर सर्व जिल्ह्यांमध्ये  9 जून ते 12 जून अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. मुंबईत दरवर्षी पावसात ठिकठिकाणी पाणी साचते. त्यामुळे यावर्षी पाणी साचून मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, म्हणून मुंबई महापालिका प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली होती. पण पहिल्याच पावसात मुंबईत साचलेल्या पाण्याने महापालिकेच्या व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

या भागांत साचले पाणी

मुंबई शहरासह उपनगरातही जोरदार पावसाने ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे सायन, चेंबूर, अंधेरी, कुर्ला, गोरेगाव, वरळीसह मुंबईतील विविध भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. त्यामुळे आधीच रेल्वे बंद असल्याने बस किंवा इतर वाहनांनी प्रवास करणा-या चाकरमान्यांना प्रचंड त्रास होत असून, त्यांनी प्रशासनाबाबत संताप व्यक्त केला आहे.

लोकल सेवा ठप्प

दरवर्षी प्रमाणेच यावर्षीसुद्धा मध्य रेल्वेची रोज ‘मरे’ त्याला कोण रडे? अशी अवस्था झाली आहे. कुर्ला रेल्वे स्थानकात पाणी साचल्यामुळे व हार्बर लाईन वरील कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकांदारम्यान लोकल रेल्वे सेवा बंद ठेवण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here