पुराचा असाही बसला फटका, इतक्या शाळांचे नुकसान

शाळांचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी अंदाजे 28 कोटी 20 लाख 76 हजार रुपयांपर्यंतची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे.

राज्यातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, रायगड, ठाणे, पालघर, पुणे अशा नऊ जिल्ह्यांतील एकूण 456 शाळा या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झाल्या असल्याचे प्राथमिक पाहणीतून आढळून आले आहे.  यात काही ठिकाणी वर्गखोल्यांच्या संरक्षक भिंती, छप्पर यांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शालेय साहित्य, पाठ्यपुस्तके पाण्यात वाहून गेली आहेत. या सर्व शाळांचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी अंदाजे 28 कोटी 20 लाख 76 हजार रुपयांपर्यंतची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे.

शिक्षणमंत्र्यांनी दिले निर्देश

अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थ‍ितीमुळे नुकसान झालेल्या शाळांची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दूरदृष्यप्रणाली मार्फत झालेल्या बैठकीच्या माध्यमातून घेतली. शाळांच्या दुरुस्तीचे नियोजन करुन तेथे लवकरात लवकर शिक्षण सुरू करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. ज्या ठिकाणी पाठ्यपुस्तकांचे नुकसान झालेले आहे, त्या ठिकाणी नव्याने पाठ्यपुस्तके पुरवण्याचे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी नियोजन करुन ऑफलाईन, ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था करावी. नुकसान झालेल्या शालेय पोषण आहारातील तांदूळ व धान्य आदी वस्तूंचा पुरवठा पुन्हा करण्यात यावा. पूरस्थितीमुळे उद्‍भवणाऱ्‍या आजारांचा विचार करुन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे आणि पुरामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी पर्यायी वसतीगृहाच्या व्यवस्थेचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही गायकवाड यांनी यावेळी दिल्या.

(हेही वाचाः एसटीच्या तिजोरीत महापुरामुळे आला ‘दुष्काळात तेरावा’)

स्वयं अध्ययनासाठी पुस्तिका, हॅम रेडिओ, स्थानिक टिव्ही

पूर परिस्थ‍ितीमुळे जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच, विद्यार्थ्यांसाठी विविध माध्यमातून शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील 38 शाळा पुरामुळे बाधित झाल्या. हा भाग डोंगराळ असल्याने इथे ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधेत अडचण येत होती. या परिस्थ‍ितीत महाबळेश्वर पंचायत समितीमार्फत ‘माझी दैनंदिनी’ या उपक्रमांतर्गत स्वयं अध्ययनासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तिका उपलब्ध करून दिल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगांव येथील स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनीवरून ‘टिव्ही वरील शाळा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यात स्थानिक शिक्षक विद्यार्थ्यांना टिव्हीवरून अभ्यासक्रम शिकवत आहेत.

(हेही वाचाः पालकांसाठी खुशखबर! खासगी शाळांच्या शुल्कात १५ टक्के कपात!)

रायगड जिल्ह्यातील दरडप्रवण भागातील तळीये, सह्याद्रीवाडी येथे शाळेसोबत संपूर्ण गावाचेच पुनर्वसन करावे लागणार आहे. या भागात ऑफलाईन शिक्षणाबरोबरच हॅम रेडीयोच्या माध्यमातून शिक्षण देण्याची सुरुवात येत्या 10 ऑगस्टपासून प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here