रेल्वे स्थानकांभोवतीचा फेरीवाल्यांचा विळखा सुटतोय! जे चहल यांना जमले नाही, ते पांडेंनी करून दाखवले

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी फेरीवाल्यांच्या नाड्या आता चांगल्याच आवळल्या असून दादरसह सर्वच रेल्वे स्थानकांपासून १५० मीटरवरील कारवाई कडक केली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई पोलिसांमार्फत केली जात आहे. पोलिसांनी सर्व फेरीवाल्यांना दमात घेतच या कारवाईला सुरुवात केल्याने मोकळ्या रस्त्यावरुन चालतांना स्थानिकांकडून पोलीस आयुक्तांचे विशेष आभार मानले जात आहे. जे महापालिका आयुक्तांना जमले नाही ते संजय पांडे यांनी करू दाखवले  आहे. त्यामुळे ही कारवाई अशाचप्रकारे चालू राहावी, अशी अपेक्षा स्थानिक करत आहेत.

दादर रेल्वे स्थानकाचा परिसर संपूर्ण दिवस मोकळा दिसला

मुंबईतील रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बंदी करण्यात यावी, अशाप्रकारचे निर्देश पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिले होते. त्यानंतरही कोणत्याही प्रकारची कारवाई महापालिका आणि पोलिसांकडून केली जात  नव्हती. परंतु फेरीवाल्यांवरील कारवाईबाबत पांडे यांनी याचा आढावा घेत पोलिसांनी ही कारवाई अधिक कडक करायला लावली. याबाबत पोलीस आयुक्तांनी पुन्हा पोलिसांनी दिलेल्या निर्देशानुसार गुरुवारी सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांनी रेल्वे स्थानकाजवळील फेरीवाल्यांना समज देत तात्काळ धंदे बंद करावे, अशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे शनिवार दादर रेल्वे स्थानकाचा परिसर संपूर्ण दिवस मोकळा राहिलेला पहायला मिळाला. शिवाय रविवारीही ५ पोलीस अधिका-यांना तैनात करून यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. रविवारीही फेरीवाले बसणार नाही याची विशेष काळजी पोलीस घेणार असून यापुढे एक जरी फेरीवाला स्थानक परिसरात बसलेला दिसला तर त्याच्यावर कारवाई होईल, असाही इशारा पोलिसांनी दिला असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा शिवसेनेचा वर्धापनदिन हॉटेलमध्ये साजरा होणार!)

नागरिकांकडूनही संजय पांडे यांचे आभार

दादरप्रमाणेच घाटकोपर, कुर्ला, बोरीवली, भांडुप, मुलुंड आदी भागांमधील फेरीवाल्यांवरही कडक कारवाई केली जात आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरांमधील फेरीवाल्यांवर कारवाई करणे आता पोलिसांना भाग पडले असून जर रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाले दिसल्यास पोलिसांवरच कारवाई  करण्याचा इशारा आयुक्तांनी दिल्याने पोलिसांनी ही कारवाई कडक केल्याचे बोलले जात आहे. मात्र, पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत कारवाई केल्यास स्थानक परिसर फेरीवालामुक्त पहायला मिळेल, असा विश्वास आता नागरिकांना वाटू लागला आहे. त्यामुळे स्थानिकांसह नागरिकांकडूनही संजय पांडे यांचे आभार मानले जात असून सरकारने त्यांची मुदत वाढवून द्यावी, अशीही इच्छा नागरीक प्रकट करताना दिसत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here