टाळी वाजवायची कुठे जाऊन? जाणून घ्या तृतीयपंथीयांचे दुःख!

हातावर पोट असल्याने लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरणार कसे आणि टाळी वाजवायची कुठे, याच विवंचनेत तृतीयपंथी पडले आहेत.

111

त्यांच्या हातून वाजणाऱ्या कर्कश टाळीचा आवाज येताच आपल्या सर्वांच्या माना वर होतात. मग डोक्यावर त्यांचा हात ठेवला जातो आणि दे राजू. . . दे मुन्ना. . . दे अम्मा. . . असे म्हणत तो हात पुढे करतो. मग आपण एक, दोन रुपये त्यांच्या हाती ठेवतो आणि तोही आपलं भलं व्हावं असं म्हणत समाधानाने पुढे निघून जातो. तो जेव्हा ती टाळी वाजवतो, ती फक्त टाळी नसते, तर त्याच्या आयुष्याच्या असहाय्य वेदनेचा तो आवाज असतो. पण या पहिल्या लॉकडाऊननंतर कसेबसे स्वत:ला सावरणाऱ्या या तृतीयपंथीयांना, आता दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये जगावे कसे हाच प्रश्न पडला आहे. हातावर पोट असल्याने लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरणार कसे आणि टाळी वाजवायची कुठे, याच विवंचनेत तृतीयपंथी पडले आहेत.

अशी आहे तृतीयपंथीयांची वेदना

मुंबईसह राज्यात बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून ३० एप्रिलपर्यंत १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व वर्गातील लोकांना बाहेर फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांचे जीवनच भिक्षेवर अवलंबून आहे, त्या तृतीयपंथीयांसमोर पुढील दिवस कसे घाालवायचे, असाच प्रश्न उपस्थित झाला आहे. भांडुप सोनापूर येथील वस्तीत अशाप्रकारे ५०हून अधिक तृतीयपंथी राहत असून, त्यांच्या डोळ्यात या लॉकडाऊनच्या बातमीनेच पाणी आणले आहे. मोठे लग्न सोहळे असो, नवीन दुकानांचे ओपनिंग असो वा बाळाचा जन्म असो. त्याठिकाणाी आवर्जुन आशिर्वाद द्यायला ही मंडळी पोहोचतात. पण लॉकडाऊनमुळे लग्नकार्य मोठ्या धडाक्यात होत नाहीत. दुकानांचेही ओपनिंग होत नाही. त्यातच लॉकडाऊनमुळे फिरताच येणार नसल्याने, जे काही दोन चार पैसे मिळत होते, त्यावर आधीच पाणी सोडावे लागले आहे. त्यात आता रेल्वे लोकलमध्येही प्रवेश नाही. सिग्नलला उभे राहायचे नाही, दुकानेही बंद आहेत. मग टाळ्या वाजवत पैसे कुठे मागायचे, असा सवालच तृतीयपंथी करत आहेत.

(हेही वाचाः कडक निर्बंधांमुळे फुल शेतीचे मोठे नुकसान! काय आहे वसई-विरारमधील फुल शेतक-यांची व्यथा? वाचा…)

सरकारकडून मदतीची अपेक्षा

तृतीयपंथीयाचा उदरनिर्वाहच भिक्षेवर अवलंबून आहे. जर आम्हाला भीकच कोणी देणार नसेल, तर आम्ही जगायचे कसे असा सवाल करत, ज्याप्रमाणे इतर राज्यांमध्ये सरकार तृतीयपंथीयांना मासिक दोन हजार रुपयांची मदत करते, त्याचप्रमाणे आपल्या सरकारनेही ही मदत दिल्यास अनेक तृतीयपंथीयांच्या उदरनिर्वाहाचा मार्ग सुटेल.

उदरर्निर्वाहाचे दुसरे साधन नाही

शरीरविक्रय करणाऱ्या महिला आणि तृतीय पंथीयांसाठी काम करणाऱ्या देवामृत फाऊंडेशनच्या प्रिया जाधव यांनी सोनापूरमधील तृतीय पंथीयांची जेव्हा याबाबत आस्थेने विचारपूस केली, तेव्हा त्या सर्वांच्या डोळयांतील अश्रूच खूप काही सांगून जात होते. याबाबत बोलताना प्रिया जाधव म्हणाल्या, मी प्रथमच अशाप्रकारे तृतीयपंथीयांना रडताना पाहिले. त्यांच्या डोळयांतील ते अश्रू हे पुढचे दिवस आम्ही कसे घालवायचे? आमचा उदरनिर्वाह तर बंद झाला आहे. मग आम्ही जगायचे कसे, हाच प्रश्न विचारत होते. खरं तर आपल्यापैकी कोणाची नोकरी गेली तर आपण रस्त्यावर काहीही विकायला बसू शकतो. पण या लोकांनी तो प्रयत्न केला तरी त्यांच्याकडून वस्तूंची खरेदी करणार कोण? त्यामुळे भीक मागण्याशिवाय त्यांच्या हाती सध्या तरी काही दिसत नाही.

(हेही वाचाः संचारबंदीमुळे डबेवाल्यांची ‘उपासमार’!)

देवामृत फाऊंडेशनची मागणी

मागील लॉकडाऊनमध्ये देवामृत्त फाऊंडेशनच्यावतीने अन्नधान्यासह इतर वस्तूंचे किट त्यांना पुरवण्यात आले होते. त्यामुळे याही लॉकडाऊनमध्ये देवामृत फाऊंडेशनच्या माध्यमातून अशाप्रकारचे सामान, वस्तू पुरवण्यात येतील. जेणेकरुन त्यांना लॉकडाऊन काळात घरी काही बनवून खाता येईल. पण अशाप्रकारच्या दुर्बल घटकांची नोंद सरकारनेही घेणे आवश्यक आहे. त्यांना इतर राज्यांप्रमाणे मासिक दोन ते पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केल्यास समाजातील या उपेक्षित घटकाला पुन्हा उभे राहता येईल असे मला वाटते, असे जाधव म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.