भाईंदर ते कल्याण असा 50 किमी लांबीच्या प्रकल्पांतर्गत चार जेट्टीच्या बांधकामाला पावसाळ्यानंतर, सुरुवात करण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळाने घेतला आहे. त्यानुसार येत्या दीड ते दोन महिन्यांत बांधकामासाठी निविदा काढण्यात येणार आहेत.
मुंबई महानगरातील झपाट्याने विकसित होत असलेल्या भाईंदर, वसई, डोंबवली, कल्याण या शहरात सध्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. तसेच, सध्या असलेल्या वाहतूक व्यवस्थेवर प्रंचड ताण येत आहे. या पार्श्वभूमीवप सागरी मंडळाने आता जलवाहतुकीचा पर्याय पुढे आणला आहे. त्यानुसार भाईंदर थेट कल्याणशी जलमार्गाने जोडण्यात येणार आहे. हा राष्ट्रीय जलमार्ग-53 या नावाने ओळखले जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत भाईंदर ते कल्याणदरम्यान 10 स्थानके म्हणजे जेट्टी बांधण्यात येणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील भाईंदर, काल्हेरस कोलशेत आणि डोंबिवली या चार जेट्टीच्या कामास केंद्राची मंजुरी मिळाली आहे.
( हेही वाचा :मोठी दुर्घटना : नेरूळमध्ये इमारतीचे छत कोसळले )
99 कोटींचा खर्च अपेक्षित
या चार जेट्टीच्या कामासाठी 99 कोटी 68 लाख रुपये इतका खर्च अपेक्षित असून या निधीस 15 फेब्रुवारीला मान्यता मिळाली आहे. सागरमाला योजनेनुसार, यातील 50 टक्के निधी केंद्र सरकारकडून तर 50 टक्के निधी राज्य सरकारकडून उपलब्ध होणार आहे. हा संपूर्ण 50 किमीचा जलमार्ग सेवेत दाखल झाल्यास भाईंदर ते कल्याण हे अंतर कमी वेळात कापता येणार आहे.