दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता आपल्याला गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात ‘दिवाळी स्पेशल’ १४९४ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान या गाड्या धावणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये व शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात. तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात. अशावेळी हे सर्व प्रवाशी एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे यंदा दिवाळीच्या सणात जोडून आलेल्या सुट्ट्या पाहता महामंडळाने १ हजार ४९४ जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे.
सध्या औरंगाबाद प्रदेशातून ३६८, मुंबई २२८, नागपूर १९५, पुणे ३५८, नाशिक २७४ व अमरावती येथून ७१ गाड्या सोडण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली.
ज्येष्ठांची सवलत कायम
एसटी महामंडळाने ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेतंर्गत ७५ वर्षावरील नागरिकांना एसटीच्या सर्व सेवेमधून मोफत प्रवास लागू केला आहे. तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवांमधून ५० टक्के सवलत अनुज्ञेय करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात जेष्ठ नागरिकांनीही या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चन्ने यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community