एसटी चालक-वाहकांनो, दारू पिऊन याल, तर डेपोच्या बाहेर जाल

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीने एक तातडीचा निर्णय घेतला आहे. सध्या राज्य परिवहन महामंडळाचे वाहक आणि चालक यांच्यामध्ये मद्यपानाचे व्यसन वाढले आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांचे जीव धोक्यात जात आहेत. त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महामंडळाने यावर काही नियमावली बनवली आहे. रा.प. महामंडळाच्या कार्यपध्दतीनुसार कामगिरीवर जाणा-या चालक/वाहकांनी मद्यप्राशन केले नसल्याची खात्री करुनच वाहतूक नियंत्रण कक्षातील वाहतूक नियंत्रकाने चालक/वाहकांना कर्तव्यावर पाठविणे आवश्यक आहे, असे महामंडळाने म्हटले आहे.

काय म्हटले आहे महामंडळाच्या निर्णयात? 

  • कामगिरीवरील सर्व चालकांनी मद्यप्राशन केलेले नाही, याची तपासणी व खात्री करुनच वाहन परिक्षक यांनी वाहन चालकांच्या ताब्यात द्यावे.
  • वाहतूक नियंत्रण कक्षातील वाहतूक नियंत्रकाने चालकाने मद्यप्राशन केलेले नाही, याची खात्री करुनच बस स्थानकावरुन बस मार्गस्थ करण्यात यावी.
  • वाहतूक नियंत्रक/पर्यवेक्षक/वाहन परिक्षक यांना कामगिरीवर हजर होणारे चालक मद्यप्राशन केलेले आढळल्यास, स्थानक/आगार प्रमुख यांना याची माहिती देतील. संबंधित चालकाला कामगिरीवरुन उतरुन घेतील व त्वरित त्याबाबत नियमांनुसार, वैद्यकीय चाचणी, पोलीस फिर्याद व प्रमादीय कारवाई करतील.

(हेही वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार का?)

  • आगाराच्या नियंत्रणाखालील सर्व बसस्थानकात वरील कार्यपध्दतीची अंमलबजावणी केली जाईल याची जबाबदारी आगार व्यवस्थापक यांची राहील.
  • ज्या आगारात अल्कोहोल टेस्ट मशिन उपलब्ध आहे त्या आगारांनी स्वतःच्या व इतर आगारांच्या मार्गस्थ होणाऱ्या बसेसच्या चालकांची प्रामुख्याने लांब पल्ला रातराणी बसेसची तपासणी करावी व त्याची नोंद स्वतंत्र रजिस्टरमध्ये घेण्यात यावी.
  • सदर बाबतीत विभागात वेळोवेळी गोपनीय पध्दतीने विषेश तपासणी मोहीम राबविण्यात यावी. या मोहिमे दरम्यान अल्काहोल टेस्ट मशीनव्दारे विभातील सर्व मार्गतपासणी पथके, वाहतूक निरीक्षक चालक प्रशिक्षण व सुरक्षा व दक्षता विभागातील पर्यवेक्षक यांचेमार्फत तपासणी कार्यक्रम राबविण्यात यावा मार्ग तपासणी पथकातील पर्यवेक्षकांनी मार्ग तपासणी करतांना चालकाची अल्कोहोल तपासणी करतील व त्याची नोंद रजिस्टरमध्ये ठेवतील.
  • चालकांनी कामगिरीवर असतांना मद्यप्राशन केलेले असल्याचे आढळल्यास या प्रकरणी रा.प सेवेतून बडतर्फी हीच शिक्षा असल्याबाबत सर्व चालकांना अवगत करण्यात यावे/ त्यांच्या मनावर बिंबविण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत चालक मद्यप्राशन करुन कर्तव्यावर जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • या सर्व सुचनांचे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विभाग नियंत्रक व विभागीय वाहतूक यांची आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here