देशातील उत्तर आणि मध्य भागांत उष्णतेची काहिली सुरू असताना, राज्यातील चंद्रपुराच्या कमाल तापमानाने पुन्हा जागतिक नोंदीत बाजी मारली आहे. चंद्रपुराचे कमाल तापमान शनिवारी ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले. जागतिक पातळीवर जगभरातील सर्वात कमाल तापमानातील शहरांच्या यादीत चंद्रपुराचे कमाल तापमान नवव्या स्थानावर पोहोचले.
या शहरांचा समावेश
४४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद असलेल्या शहरांत चंद्रपुरासह पाकिस्तानातील बहवालपूर, दक्षिण आफ्रिकेतील माली देशातील कईज, पाकिस्तानातील खानपूर, सीबी, मली शहरातील यलीमन या शहरांचाही समावेश आहे. या शहरांना जागतिक पातळीवर आठवे, दहावे, अकरावे, बारावे आणि तेरावे स्थान मिळाले आहे.
(हेही वाचाः अमृता म्हणते, आगीशी खेळू नका)
देशातही चंद्रपूर अव्वल
देशातही चंद्रपुरात सर्वात जास्त कमाल तापमान नोंदवले गेले. मार्च महिन्यातही चंद्रपुरातील कमाल तापमान जागतिक नोंदीत पहिल्या पाचमध्ये नोंदवले गेल्यानेही देशातील वाढत्या काहिलीबाबत पर्यावरण अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली होती. आता एप्रिल महिन्याच्या तिस-या आठवड्यात चंद्रपूर पुन्हा कमाल तापमानाच्या नोंदीत देश आणि जगभरात मोडला जात आहे.
जम्मू-काश्मीर, लडाखमध्येही वाढले तापमान
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड तसेच पूर्व उत्तर प्रदेशचा भाग, पश्चिम बंगाल, सिक्कीम, कर्नाटकातील किनारपट्टीतील भाग आणि राज्यातील विदर्भातील कमाल तापमान सध्या सरासरीहून तीन अंशाने जास्त नोंदवले जात असल्याची माहिती भारतीय वेधशाळेने दिली. जम्मू-काश्मीर, लडाख या भागांतही कमाल तापमान सरासरीहून तीन ते पाच अंशाने जास्त नोंदवले जात आहे.
(हेही वाचाः यंदा ९९ टक्के पाऊस; मान्सूनचा अंदाज जाहीर)
पावसाची शक्यता
विदर्भात रविवारपासून दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय वेधशाळेने दिला आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मंगळवारपासून सलग दोन दिवस पाऊस येईल, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने दिला आहे.
Join Our WhatsApp Community