मुंबईत जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात आता किमान तापमान खाली घसरायला सुरुवात झाली आहे. सोमवारी राज्यातील मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांत किमान तापमान दहा अंशाखाली सरकल्याची नोंद झाली. सध्या देशातील उत्तर भागांत थंडीचा जोर वाढत असल्याने राज्यातील तापमानही आता कमी होत असल्याने यंदाचा आठवडा गारठवणा-या थंडीचा असणार आहे. देशात उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या पश्चिमेकडील भागांत थंडीची लाट आली आहे. या लाटेच्या प्रभावाने मध्य महाराष्ट्रातील ठराविक भागांत किमान तापमान घसरण्याची शक्यता वेधशाळेच्या अधिका-यांनी व्यक्त केली.
रविवारपासून राज्यातील काही जिल्ह्यांत किमान तापमानात सरासरीपेक्षाही तीन ते चार अंशाने घटल्याचे दिसून आले. सोमवारी मुंबईतील सांताक्रूझ येथे किमान तापमान १५.८ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. नजीकच्या डहाणूत किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले होते. औरंगाबाद येथे किमान तापमान ९.४ अंश सेल्सिअसवर खाली घसरले. जळगावात १०, नाशिक १०.२ अंश सेल्सिअस किमान तापमान घसल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून सांगण्यात आले. विदर्भात किमान तापमानात अद्यापही फारशी घसरण झालेली नाही. नागपूरात किमान तापमान १७.६ अंश सेल्सिअस तर गोंदियात १५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात येत्या काही दिवसांत किमान तापमान एक ते दोन अंशाने अजून खाली घसरण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
( हेही वाचा: आता एकाच तिकिटावर करता येणार भारतभर भ्रमंती; काय आहे रेल्वेची योजना )