मुंबई विकास आराखडा -२०३४ आणि संबंधित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४नुसार, मुंबईत वाहनतळ व्यवस्थापन विषयक बाबींसाठी वाहनतळ प्राधिकरणाची निर्मिती करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार वाहनतळ प्राधिकरण निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्यास व त्यासाठी बाह्य सेवा पुरवठादार यांची व तज्ज्ञ मंडळींची नेमणूक करण्यास, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अध्यक्षतेत झालेल्या स्थायी समिती बैठकीदरम्यान नुकतीच मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
या मंजुरी नुसार निवृत्त सनदी अधिकारी रामनाथ झा यांची या कार्यवाहीसाठी मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर टाटा सामाजिक विज्ञान संस्थान यांची बाह्य सेवा पुरवठादार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या मार्फत संबंधित विषयातील तज्ज्ञ मंडळींच्या सेवा उपलब्ध करुन घेण्यात येणार आहेत, अशी माहिती नवनियुक्त वाहनतळ आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे.
(हेही वाचाः शीव रुग्णालयातील महानगर रक्तपेढीची जागा महापालिकेच्या ताब्यात)
सुरक्षित वाहनतळासाठी उपाययोजना
मुंबई शहरामध्ये दिवसेंदिवस वाहनतळाची समस्या बिकट होत चालली आहे. या समस्येचे निराकरण करण्याकरता सार्वजनिक ठिकाणी सोयीचे, सुरक्षित व परवडण्यासारखे वाहनतळ योग्यप्रकारे व विनिमयांसह उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. वाहनतळ प्राधिकरणाची निर्मिती करण्याकरता अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांची वाहनतळ आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नियोजित मुंबई वाहन प्राधिकरणचे गठन करण्याच्या दृष्टीने नेमण्यात आलेली तज्ज्ञ मंडळी प्रामुख्याने खालील ९ कामे पार पाडणार आहेत.
वाहनतळ प्राधिकरणाची कामे
- मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांमधील वाहनतळ व्यवस्थापन विषयक सर्वसमावेशक आराखडा तयार करणे.
- वाहनतळ दर निश्चितीबाबत धोरण व अभ्यास.
- वाहतूक चिन्हे व फलक यासंबंधीची कार्यवाही.
- वाहनतळाच्या अनुषंगाने विविध स्तरीय संवाद साधणे व वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे.
- वाहन व्यवस्थापनासाठी माहिती तंत्रज्ञान आधारित संगणकीय बाबींचा अवलंब करणे.
- शहरातील शासकीय, व्यवसायिक व निवासी इमारतींमधील वाहनतळ जागांचा सुयोग्य वापर करण्याच्या दृष्टीने वाहनतळ विषयक माहितीचा साठा(सिटी पार्किंग पूल) तयार करणे.
- वाहन विषयक बाबींची सुयोग्य अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने वाहनतळ मार्शल यांची नेमणूक करण्याविषयी अभ्यास.
- विकास आराखड्यातील वाहनतळ आरक्षणाबाबत कार्यवाही करणे.
- भंगार झालेल्या किंवा वापरात नसलेल्या वाहनांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे.
- भूमिगत वाहनतळ तसेच उड्डाण पुलाखालील जागांचा वापर याबाबत अभ्यास करणे.
(हेही वाचाः दुचाकीस्वाराने फरफटत नेले पोलिसाला!)
Join Our WhatsApp Community