कोविडला रोखणारा ‘मुंबई पॅटर्न’ आता दिल्लीतही राबवणार

मुंबई महापालिकेच्या 'वॉर्ड वॉर रुम' द्वारेच करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी प्रशंसा केली.

101

मुंबईतील लोकसंख्येच्या घनतेसह इतर अनेक आव्हाने असतानाही मुंबई महापालिकेने केलेल्या कार्याची सकारात्मक दखल राज्य, देश व जागतिक ‌पातळीवर वेळोवेळी घेण्यात येत आहे. याच अनुषंगाने दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी नुकताच मुंबईचा अभ्यास दौरा केला. दिल्ली सरकारच्या आरोग्य खात्याचे ज्येष्ठ अधिकारी डॉ. संजय अगरवाल आणि डॉ. धर्मेन्द्र कुमार यांचा समावेश असणाऱ्या चमूने आपल्या अभ्यास दौ-यादरम्यान महापालिकेने केलेल्या विविध स्तरीय कार्यवाहीची माहिती घेतली.

आयुक्तांच्या मार्गदर्शनात अभ्यास दौरा

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात या अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. तर अतिरिक्त महापालिका आयुक्त(पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात आयोजित एका विशेष बैठकीदरम्यान संगणकीय सादरीकरण व सविस्तर चर्चा करुन दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींना बृहन्मुंबई महापालिकेने राबवलेल्या सर्वस्तरीय कार्यवाहीबाबत माहिती देण्यात आली.

(हेही वाचाः मुंबई पाण्याखाली तरी महापौर, आयुक्त म्हणतात ‘ऑल इज वेल’!)

सुव्यवस्थापनाची पाहणी

या दौऱ्यामध्ये या अंतर्गत प्रामुख्याने वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून साध्य केलेले विकेंद्रीत व्‍यवस्‍थापन, रुग्णालयांच्या स्तरावर यशस्वीपणे राबवलेले प्राणवायू व्यवस्थापन आणि अल्पावधीत उभारलेल्या जंबो रुग्णालयांची माहिती घेतली. प्रत्यक्ष माहिती घेण्याच्या दृष्टीने या प्रतिनिधींनी गोरेगाव येथील महापालिकेच्या जंबो कोविड रुग्णालयाला आणि अंधेरी परिसरातील सेव्हन हिल्स रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन, तिथे करण्यात येत असलेल्या सुव्यवस्थापनाची प्रत्यक्ष माहिती घेतली.

लवकरच दिल्लीत राबवणार मॉडेल

या अभ्यास दौऱ्याच्या अंती अतिरिक्त महापालिका आयुक्त काकाणी व मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय चमूशी संवाद साधताना दिल्ली राज्य सरकारच्या चमूने आवर्जून नमूद केले की, मुंबई महापालिकेने केलेले कार्य अनुकरणीय असून दिल्लीत देखील लवकरच ‘मुंबई मॉडेल’ राबवण्यात येणार आहे.

महापालिकेच्या कार्याची प्रशंसा

महापालिका क्षेत्रातील सर्व खाजगी रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागातील सर्व खाटा आणि इतर खाटांपैकी ८० टक्के खाटांचे वितरण मुंबई महापालिकेच्या ‘वॉर्ड वॉर रुम’ द्वारेच करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी प्रशंसा केली. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांनी देखील या व्यवस्थेत सकारात्मक व सक्रीय योगदान दिल्याचे पाहून आपण भारावून गेलो, असल्याची भावनाही या चमूने अभ्यास दौऱ्यादरम्यान व्यक्त केल्या.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.