मुंबईत पावसाचा जोर वाढतच चालला असून येत्या काही तासांत मुंबईतील ठराविक ठिकाणी अतिवृष्टीचीही शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे. गेल्या तीन तासांपासून मध्य उपनगर परिसरात आणि दक्षिण मुंबईत पावसाचा जोर दिसून येत आहे. मुंबईत गुरुवारी बहुतांश भागांत पावसाची संततधार कायम राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दुपारच्या अंदाजपत्रात दिला आहे.
गेल्या तीन तासांत कुलाब्यात ४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज परिसरात त्या तुलनेत पावसाचा जोर दुपारच्यावेळी कमी होता. भायखळा, चेंबूर भागांत काही मिनिटांच्या ब्रेकनंतर पावसाची संततधार सुरु आहे. भायखळ्यात गेल्या तीन तासांत २० मिमी, चेंबूर टाटा पॉवर परिसरात १७ मिमी पावसाची नोंद आहे. माटुंगा आणि सायन परिसरात मात्र सकाळपासून पावसाचा शिडकावा काही सेकंदासाठी येत मुंबईकरांना छत्री उघडण्यास भाग पाडत आहे. मध्य मुंबईत विदयाविहार, विलेपार्ले येथील विमानतळ परिसरात सकाळपासून पावसाची एखाद -दुसरी सर मोठ्याने येत मुंबईकरांना ओलेचिंब करत आहे. सांताक्रूझ येथेही पावसाचा मारा सुरु असल्याने, या भागांत पावसाच्या हजेरीतच दिनक्रम सुरु आहे. त्या तुलनेत पश्चिम उपनगरात पावसाचा जोर मध्य मुंबईच्या तुलनेत कमी दिसून येत आहे. पावसाची संततधार उपनगर परिसरात कायम राहिल्यास, संध्याकाळी कमाल तापमान अंदाजे तीन अंशाने घट होत कमाल तापमान २७ अंश सेल्सिअसवर नोंदवले जाईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून दिली गेली.
( हेही वाचा: मुंबईत आज मुसळधार पावसाच्या सरी )
दक्षिण गुजरातच्या किना-यापासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या थरात द्रोणीय स्थिती (पावसासाठी अनुकूल कमी दाबाचे क्षेत्र) तयार झाले आहे. या द्रोणीय स्थितीतील बाष्प पश्चिमेकडून वाहणारे वारे सक्रिय असल्याने, पावसाच्या धमाकेदार कामगिरीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.