व्याकुळ पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने उचललं असं पाऊल

177
मुंबईत मागील काही दिवसांत उन्हाचा पारा वाढत चालला असून, याची झळ आता माणसापासून ते मुक्या पक्षी प्राण्यांनाही बसू लागली आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असल्याने, पाण्यासाठी प्रत्येकाचा जीव कासावीस होतो. मनुष्यप्राणी पाणी पिऊन कासावलेला जीव शांत करू शकतो, पण मुक्या पक्षी प्राण्यांनी काय करावे. उन्हाळ्यात नैसर्गिक तलाव आणि पाण्याची डबकी आटली गेल्याने पाण्याच्या शोधात पक्षी, प्राणी भटकू लागले आहेत. पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या पक्षी प्राण्यांची तहान भागवता यावी म्हणून आता मुंबई महापालिकेने पुढाकार घेत नव्याने विकसित केलेल्या शहरी वनांसह  इतर उद्याने आदी ठिकाणी आता पाण्याने भरलेली पात्रे ठेवण्यात आली. त्यामुळे पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी तगमग संपली आहे.
…म्हणून उद्यान विभागाने घेतला पुढाकार
मुंबईत मागील काही दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण वाढू लागले. वाढत्या उष्म्यामुळे अंगाची काहिली होत आहे. एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात मुंबईत या उन्हाच्या  पाऱ्याने चाळीशी गाठली आहे. हवामान खात्याकडून या वाढत्या तापमानाचा अंदाज वर्तवला जात आहे. उन्हाळ्यात सर्वसाधारणपणे बऱ्याच ठिकाणी पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटले जातात. सहाजिकच त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते.  मुंबईसारख्या शहरात आपल्या आजूबाजूला सहजच दिसणारे पक्षी जसे की कावळा, पोपट, चिमण्या, मैना, सूर्यपक्षी, कबूतर इत्यादी पक्ष्यांना तसेच खारुताई आदींना पाणी पिण्यासाठी नवनवीन जागा शोधाव्या लागतात. परंतु पाणी उपलब्ध होत नसल्याने, या वाढत्या तापमानाचा त्रास त्यांना होतो. त्यामुळे बऱ्याचदा पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होण्याचेही प्रकार घडतात. त्यामुळे या वाढत्या तापमानाचा अंदाज घेता पक्ष्यांचीही काळजी घेण्यासाठी महापालिका उद्यान विभागाने पुढाकार घेतला आहे.
New Project 78 1

पाणी पिऊन पक्षी होताहेत तृप्त

उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी पुढाकार घेऊन, उद्यानात पक्ष्यांसाठी पाण्याने भरलेली भांडी ठेवण्याचा निर्णय घेतला. मुंबई महापालिकेने शहरी वने विकसित करण्यासाठी मियावकी पध्दतीचा अवलंब केला. परंतु या शहरी वनातील वाढलेल्या झाडांवर आता पक्षी येऊ लागले आहेत. परंतु या शहरी वनांची सुरुवातीचे दोन ते तीन वर्षे देखभाल केली जाते. या झाडांची मग वाढ होऊ लागते. परंतु या मियावकी उद्यानात पक्षीही येत असल्याने पाण्याअभावी त्यांची होणारी धावपळ आणि शोधाशोध लक्षात घेत या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे परदेशी यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सर्व अधिकाऱ्यांना ऑर्डर काढून मियावकीसह अन्य उद्यानात पक्ष्यांकरता पाण्याने भरलेली भांडी ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार याची अंमलबजावणी होत असून पक्षीही  पाणी पिऊन तृप्त होऊन जात आहे.
IMG 20220428 WA0060

पक्ष्यांना सहजरित्या पाणी उपलब्ध होण्याकरता, उद्यानांमध्ये  पाण्याने भरलेली पात्र

याबाबत उद्यान विभागाचे प्रमुख, उद्यान अधीक्षक  जितेंद्र परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तहानेने व्याकूळ झालेल्या पक्ष्यांकरता आता उद्यानांसारख्या त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच पाण्याची सोय  केली जाणार असल्याचे सांगितले. दाट हिरवळ व आल्हाददायक वातावरण यामुळे पक्षी उद्यानांच्या आसपास मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पक्ष्यांना सहजरित्या पाणी उपलब्ध होण्याकरता  उद्यान  विभागाने त्यांच्या  ताब्यातील हजारच्या आसपास असलेल्या उद्यानांमध्ये  पाण्याने भरलेली पात्र (बर्ड बाथ) विविध ठिकाणी  ठेवण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे परदेशी यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.