यंदाच्या वर्षी गोवर रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याचे दिसून येत असताना मुंबईत गोवरमुळे पुन्हा मृत्यूसत्र सुरु झाले आहे. सायन येथील सहा महिन्यांचा मुलगा गोवरमुळे मृत्यू पावल्याचा संशय पालिका आरोग्य विभागाने व्यक्त केला. याअगोदर शनिवारी एका लहान बालकाचा गोवरमुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे.
सायन येथील सहा महिन्यांच्या बाळाला 4 तारखेला सर्दी, खोकला आणि ताप सुरु झाला. दोन दिवसांनी बालकाच्या शरीरावर पुरळ उठले. मुलाच्या शरीरावर पुरळ दिसून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पालकांनी त्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. 7 तारखेला बाळाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात हलवले. बाळाला श्वास घेता येत नसल्याने त्याला व्हेन्टीलेटरवर ठेवण्यात आले. आठवड्याभराच्या उपचारानंतरही बाळाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली नाही आणि सोमवारी पहाटे चार वाजता बाळाचा मृत्यू झाला.