बदलत्या गुन्हेगारीचे स्वरूप!

118

गेल्या २५ वर्षांत बदलत्या नवीन तंत्रज्ञानाने समाजात क्रांतीकारक बदल घडवून आणले आहेत. देश विघातक शक्ती ह्या नवीन तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेऊन विशिष्ट धर्मातील सुशिक्षित तरुण मुलांना व मुलींना मूलतत्ववादी बनवून त्यांच्याकडून दहशतवादी कृत्ये करुन घेत आहेत. त्यातील काहीजण ISIS साठी सीरिया, अफगाणीस्तान येथे पकडले गेले आहेत. अंतर्गत सुरक्षेसाठी हा फार मोठा धोका आहे.

महिलांच्या फसवणूकीत वाढ 

दहशतवादी ह्या कारवायांसाठी प्रचंड प्रमाणात ड्रग्स देशात पाठवून शस्त्रास्त्रे व निधी एकत्र करताना तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे देशातील तरुण सर्रास किळसवाणे गुन्हे करताना आढळून येत आहेत. शहरात होणार्‍या chain snatching, चोर्‍या, दरोड्याच्या घटनांमागे ड्रग्सची च़टक हे प्रमुख कारण आहे. नवीन तंत्रज्ञानाने cyber crimes च्या माध्यमातून महिलांची फसवणूक व आर्थिक गुन्हे हया मधे दरवर्षी होणारी वाढ ही भीती निर्माण करणारी आहे. आर्थिक लालचीने अनेक सुशिक्षित, महिला, वृद्ध आपले पैसे गेल्याची तक्रार रोज करताना आढळून येतात. समाज माध्यमातून ओळख झाल्याचे दाखवायचे व लग्न करण्याचे आश्वासन देऊन महिलांची शारीरिक व आर्थिक फसवणूक करण्याचे गुन्हे वारंवार घडत आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन लहान मुलांवर लैँगिक अत्याचाराच्या घटना व मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमागे आंतरराष्ट्रीय  टोळ्या निष्पन्न झाल्या आहेत.

आरोपींच्या धाडसात वाढ 

T.V. channels वर दिसणार्‍या सिनेमांमधील हिंसाचार व लैंगिकता, तसेच दारू, ड्रग्स या व्यसनांमुळे महिलांची छेडछाड करण्याच्या घटनाही सर्वत्र वाढत आहेत. चिंतेची बाब म्हणजे महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये ९८.५% घटना या महिलेच्या ओळखीच्या व्यक्तींनी केलेल्या होत्या. पीडितेचे वडील, भाऊ, नातेवाईक, शेजारी हेच आरोपी होते. अशा गुन्ह्यात पीडित व्यक्ती दिवस जाईपर्यंत पोलिसांत तक्रार करत नाही व तक्रार केल्यानंतरही नातेवाईकांच्या दबावाने तक्रार मागे घेते किंवा न्यायालयात जबाब बदलते. त्यामुळे आरोपी धाडसीपणे समाजात फिरत राहतात. गेल्या काही वर्षात लग्न करण्याऐवजी live-in relationship मध्ये राहण्याचा कल तरुणांमधे वाढत आहे. कालांतराने यातील स्त्रिया ‘मला लग्नाचे आमिष दाखवले, माझ्यावर बलात्कार केला’ अशा तक्रारी करतात, परंतु न्यायालय त्या तक्रारी अमान्य करते.

म्हणून पोलिसांवरील विश्वास होतोय कमी 

राजकीय व वैयक्तिक हेव्यादाव्यातून विरोधी व्यक्तींवर खोटे गुन्हे दाखल करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. पोलीस ठाण्यात जाण्यापूर्वी वकिलांकडे जायचे व दिवाणी गुन्हे फौजदारी गुन्ह्यात बदलायचे व पोलीसांवर दबाव टाकून विरोधकांना सतवायचे ही प्रवृत्ती वाढत आहे. खोटे गुन्हे दाखल करायला लावून विरोधी पक्षीयांना अटक करा, त्यांची पोलीस कोठडी मागा अशी मागणी राजकीय नेते वारंवार करतांना आढळतात. त्यामुळे पोलीस बळाचा गैरवापर होतो व समाजाचा पोलीसांवरील विश्वास कमी होत असतो. असे खटले न्यायालयात प्रदीर्घ काळ चालू राहतात व त्यामुळे विरोधी पक्षीयांना मनस्ताप सहन करायला लागतो. जे पोलीस अधिकारी अशा प्रकारे गुन्हे दाखल करण्यास व विरोधी पक्षीयांना अटक करण्यास नकार देतात, त्यांना आकसाने कठीण, दूरच्या ठिकाणी बदलले जाते. त्यामुळे पोलीस अधिकार्‍यांचे मनोधैर्य खच्ची होते. अनेक समाजविघातक शक्ती जसे वाळू माफिया, जमिन माफिया कर्तव्यदक्ष शासकीय व पोलीस अधिकार्‍यांवर हल्ले करतात व काही वेळा या निरपराध अधिकार्‍यांचा त्यात बळीही जातो.

( हेही वाचा: पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी केल्या या दोन मोठ्या घोषणा ! )

..तरच कायदा आणि सुव्यवस्था राहणार चांगली

राजकीय पक्षावरील परिस्थिती सुधारण्यासाठी क्वचितच प्रयत्न करतांना दिसतात. उलट सांगू तसे वागणारे व भ्रष्टाचार करणार्‍या अधिकार्‍यांनाच कार्यकारी पदावर नेमले जाते. त्यामुळे कायदा सुव्यवस्था ढासळून अशा वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनाही निलंबित करावे लागते. ह्यासाठी पोलीस अधिकारी व जनता ह्यांच्यामधे विश्वासाचे वातावरण निर्माण होण्याची आवश्यकता आहे. पोलिसांनी जनतेतील सुयोग्य स्त्री-पुरुषांना पोलीस मित्र म्हणून काम करण्यास प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. नवनवीन गुन्ह्यांबद्दल पोलीस मित्रांच्या माध्यमातून जनतेचे प्रबोधन करणे व जनतेस स्वसंरक्षण करण्यास मदत करणे यातूनच येणार्‍या काळात कायदा व सुव्यवस्था चांगली राहण्यास मदत होईल.

 

(लेखक निवृत्त पोलिस महासंचालक आहेत.) 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.