३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना १ जुलैची काल्पनिक वेतनवाढ सरसकट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या लढाईला यश मिळाल्याची भावना सेवानिवृत्त राज्यकर निरीक्षक वसंत उटीकर यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना व्यक्त केली.
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) ५ जुलै २०२२ रोजी दिलेल्या निकालात महाराष्ट्र शासनाच्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक इत्यादी निरनिराळ्या शासकीय कार्यालयातील/विभागातील एकूण ७ प्रकरणात ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना १ जुलैची काल्पनिक वेतनवाढ देण्याबाबतचा निर्णय घेतला होता. त्यानंतरही प्रत्यक्ष शासन निर्णय जाहीर होण्यासाठी बरीच मोठी कायदेशीर लढाई विविध विभागातील कर्मचाऱ्यांना लढावी लागली होती.
(हेही वाचा – Thackeray Group : ठाकरे गटाचे शनिवारी शक्तिप्रदर्शन; मुंबई महापालिकेवर मोर्चा)
८ जुलै २०२२ रोजी ‘हिंदुस्थान पोस्ट’ने यासंदर्भात वृत्त प्रसारित केले होते. या बातमीची शासनाला गंभीर दखल घ्यावी लागली. अखेर २८ जून २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाने याबाबत शासन निर्णय जाहीर केला. त्यात, ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना १ जुलैची वेतनवाढ सरसकट लागू केली जाणार असल्याचे म्हटले आहे.
जीएसटी भवनातील २४ कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळणार
या निर्णयामुळे वस्तू व सेवाकर विभाग, जीएसटी भवनातील एकूण २४ कर्मचारी यांना ही वेतनवाढ मिळणार आहे. त्यामध्ये वसंत उटीकर, शाम लगाडे, हमीद कागदी, सुल्तान करीमउद्दीन, श्रीकांत गवळी, लक्ष्मण हेंद्रे, अंबादास जाधव, जयसिंग सुतार, मोहन साळवी, धानजी चन्ने, उल्हास साळवे, गौतम ओव्हाळ, हरिश्चंद्र गोविलकर, पद्मिमनी पलांडे, अशोक सावंत, प्रकाश अहेर, सुप्रिया साळवी, जयप्रकाश चौधरी, गौतम मोकल, विनोद ढबाळे, जतीन पाटील, सुनील बागुल, छाया क्षिरसागर, सरस्वती कोळी, हरी कुलकर्णी व नीलम तुळसकर यांच्यासहीत इतर ६ विभागांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community