मागील दोन ते तीन वर्षांपासून संपूर्ण जग वेगवेगळ्या व्हायरसच्या आजारांना तोंड देत आहे. भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या विषाणूंनी डोकं वर काढलं आहे. पुन्हा रुग्णालयांमध्ये मास्क सक्ती झाली आहे. अशातच सक्रिय रुग्णांची संख्याही दिवसागणिक वाढतांना दिसत आहे. शुक्रवार, १४ एप्रिल रोजी देशात ११ हजार १०९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याआधी बुधवार, १२ एप्रिल रोजी ७ हजार ८३०, तर गुरुवार, १३ एप्रिल रोजी १० हजार १५८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या जवळपास पन्नास हजाराच्या घरात येऊन पोहोचली आहे. देशात एकूण ४९ हजार ६२२ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं झालं आहे.
(हेही वाचा –तुमच्या मुलाची शाळा खरी आहे ना? तपासून पहा… मुंबईत आहेत ‘एवढ्या’ बोगस शाळा)
गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या विषाणूंसोबतच ‘आर्कटुरस’ या नव्या विषाणूचे देखील रुग्ण आढळून येत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढतांना दिसत असली तरी रुग्णालयात रुग्णांचे दाखल होण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. त्यामुळे लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सद्यस्थिती लक्षात घेता ६० वर्षांवरील अधिक नागरिकांनी, सुरुवातीपासून एखादा आजार असणाऱ्यांनी, तसेच ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच कोरोनाच्या प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य काळजी घेतल्यास कोरोना विषाणूला रोखता येणे सहज शक्य आहे.
Join Our WhatsApp Community