मुंबईत पुन्हा रुग्णसंख्या घटली… गुरुवारी दिवसभरात ८ हजार ९३८ रुग्ण!

मुंबईत काही दिवसांपासून झपाट्याने वाढणारा कोरोनाचा आजार आता पुन्हा नियंत्रणात येताना दिसत आहे. बुधवारी दहा हजारांच्या घरात असलेली कोविडबाधित रुग्णांची संख्या गुरुवारी ८ हजार ९३८ एवढी होती. तर दिवसभरात २३ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईकरांसाठी घटणारी रुग्णसंख्या ही एकप्रकारे समाधान देणारी बाब आहे. मुंबईकरांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करताना त्रिसूत्री आत्मसात केल्यास, मुंबईतील कोरोना अजून नियंत्रणात आणण्यात महापालिकेला यश येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

चाचण्या जास्त पण बाधित रुग्ण कमी

मुंबईत गुरुवारी दिवसभरात ८ हजार ९३८ रुग्ण आढळून आले. तर ४ हजार ५०३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. गुरुवारपर्यंत एकूण उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही ८६ हजार २७९ एवढी होती. तर दिवसभरात २३ रुग्ण मृत पावले असून, यामध्ये १९ पुरुष आणि ४ स्त्रियांचा समावेश आहे. यामधील १७ रुग्ण हे दीर्घकालीन आजारी होते. १६ रुग्णांचे वय हे ६० वर्षांपुढील होते. दिवसभरात ४८ हजार ९०२ लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात चाचण्या करुनही रुग्णांची संख्या ९ हजारच्या आतच आल्याने, मुंबईकरांसाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. बुधवारी १७ हजार ४३१ रुग्ण हे कोविड रुग्णालये व कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होते, पण गरुवारी याठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १७ हजार ४९१ एवढी होती.

(हेही वाचाः …तर मुंबईत शनिवारपासून लसीकरण पूर्णपणे ठप्प!)

धारावीही शंभरीच्या उंबरठ्यावर

दादर, माहिम आणि धारावी या जी-उत्तर विभागातील दादर व माहिममधील रुग्णांनी शंभरी गाठलेली असताना, कालपर्यंत नियंत्रणात असलेली धारावीही शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन बसली आहे. धारावीमध्ये दिवसभरात तब्बल ९९ रुग्ण आढळून आले. तर माहिममध्ये १३४ व दादरमध्ये १२१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिवसभरात जी-उत्तर विभागात ३५४ रुग्ण आढळून आले आहेत. धारावीमध्ये बुधवारी ७५ रुग्ण आढळून आले होते, पण गुरुवारी ही संख्या ९९ एवढी झाली. त्यामुळे धारावीतील एकूण रुग्णांची संख्या ही ५ हजार ४७४ एवढी झाली आहे. तर माहिम व दादरमध्ये दैनंदिन रुग्णांची संख्या शंभरी पार झालेली असतानाच, धारावीत एकाच दिवशी ९९ रुग्ण आढळून आल्याने ही चिंतेची बाब आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here