राज्यातील ओमायक्रॉन विषाणूमुळे अचानक आलेल्या तिस-या लाटेतील कोरोना रुग्णांची संख्या जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर सव्वा महिन्यातंच आता दहा हजारांच्या खाली आली. या काळात तीन लाखांहून पुढे गेलेल्या सक्रीय रुग्णांची संख्या शुक्रवारी दहा हजारांच्या आत नोंदवली गेली. शुक्रवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आता कोरोनाचे केवळ ८ हजार ६८८ रुग्ण उरले आहेत. मात्र तिसरी लाट संपली असे थेट बोलता येणार नाही. आपण ओमाक्रॉनच्या तिस-या लाटेच्या आगमनापूर्वी असलेल्या फेरीत परतल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी दिली.
शुक्रवारच्या नोंदीत राज्यातील रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात एका टक्क्याने वाढ दिसून आली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०१ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. आता घरी विलगीकरणात असलेल्या माणसांची संख्याही दीड लाखांपेक्षा कमी झाली आहे. राज्यात घरी विलगीकरणात आता केवळ १ लाख ४७ हजार ९७७ माणसांना ठेवण्यात आले आहे.
(हेही वाचा रस्त्यावरील अन्नपदार्थ वर्तमानपत्रांतून विकाल तर खबरदार …)
- गुरुवारी नोंदवलेले कोरोनाचे नवे रुग्ण – ९७३
- गेल्या २४ तासांत बरे झालेले रुग्ण – २ हजार ५२१
- गेल्या २४ तासांत मृत्यू पावलेल्या कोरोना रुग्णांची संख्या १२
- राज्यातील मृत्यूदर – १.८२ टक्के
- राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या – १७३
- २५ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यातील ओमायक्रॉनची तिसरी लाट आटोक्यात आल्याच्या दहा दिवसानंतर रुग्णांची संख्या ८ हजार ६८८ हून अधिक आहे.
तिस-या लाटेच्या आगमनाअगोदर –
- गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर हळूहळू ओमायक्रॉनचे रुग्ण दिसून आढळले होते.
- १२ डिसेंबर २०२१ रोजी राज्यात ६ हजार ४४१ कोरोनाचे रुग्ण होते. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७२ टक्के होते.
- २४ डिसेंबर २०२१ रोजी राज्यात ८ हजार ४२६ कोरोनाचे रुग्ण आढळून आले. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६९ टक्के नोंदवले गेले.
- २६ डिसेंबर २०२१ – तिस-या लाटेच्या आगमनाच्या पहिल्या दिवशी राज्यात ९ हजार ८१३ रुग्ण नोंदवले गेले. राज्यात तोपर्यंत ओमायक्रॉनचे १६१ रुग्ण आढलून आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
- ५ जानेवारी २०२२ – आरोग्य विभागाला राज्यात तिसरी लाट आल्याची स्पष्ट कल्पना आली. या दिवशी राज्यात एकाच दिवसात २६ हजार ५३८ कोरोनाचे रुग्ण आढळले. तर राज्यभरात ८७ हजार ५०५ कोरोनाचे रुग्ण नोंदवले गेले. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५५ टक्क्यांनी कमी झाले आहे.