मुंबईतील रुग्णांचा आकडा घटला, पण झोपडपट्यांमध्ये वाढला!

मागील दहा दिवसांमध्ये झोपडपट्ट्या व चाळी आदीमध्ये कंटेन्मेंट झोनच्या संख्येत दुपटीने वाढ  झालेली असून इमारतीसह आता झोपड्यातही कोरोना पसरताना दिसत आहे.

76

मुंबईत मागील आठवड्यापासून दैनंदिन रुग्णांची संख्या सरासरी सहा हजारांच्या आसपास पोहोचलेली असताना मंगळवार, ३० मार्च रोजी रुग्णांची संख्या ४,७५८ एवढी आढळून आली. ही संख्या केवळ चाचण्यांची संख्या निम्म्यावर असल्याने कमी झाली असून आजवर होणाऱ्या सरासरी ४८ हजारांच्या तुलनेत सोमवारी केवळ २४ हजारच चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या कमी आढळून आली असून येत्या दिवसांमध्येही चाचण्यांची संख्या वाढल्यास रुग्ण संख्याही वाढलेली पाहायला मिळणार आहे. दरम्यान मागील दहा दिवसांमध्ये झोपडपट्टया व चाळी आदी कंटेन्मेंट झोनच्या संख्येत दुपटीने वाढ  झालेली असून इमारतीसह आता झोपड्यातही कोरोना पसरताना दिसत आहे.

१० जणांचा मृत्यू! 

मुंबईमध्ये सोमवारी, २९ मार्च रोजी जिथे ५,८८८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते, तिथे मंगळवार एकूण  ४,७५८ रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात ३,०३४ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर सोमवारपर्यंत  ४९ हजार  १६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर सोमवारी १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या दहा पैकी ६ रुग्ण हे दिर्घकालिन आजारी होते. दिवसभरात मृत्यू पावलेल्यांमध्ये ६ रुग्ण हे पुरुष व ४ महिला रुग्णांचा समावेश होता.

(हेही वाचा : मुंबईसह राज्यात निर्बंध कि लॉकडाऊन?)

कंटेन्मेंट झोपडपट्ट्यांची संख्या वाढली!

मंगळवारपर्यंत मुंबईतील ६९ झोपडपट्टी व चाळी या कंटेन्मेंट झोनमध्ये समाविष्ठ झाल्या होत्या. सोमवारीपर्यंत ही संख्या ६४ पर्यंत होती. एका दिवसामध्ये ५ झोपडपट्ट्या व चाळींची संख्या वाढली. अवघ्या दहा दिवसांपूर्वी मुंबईमध्ये केवळ ३४ झोपडपट्टी व चाळी या कंटेन्मेंट झोन होत्या. त्यामुळे एकप्रकारे या कंटेन्मेंट झोनची संख्या वाढली जात असून झोपडपट्ट्या व चाळींमध्ये नियंत्रणात असलेला कोरोनाचा आजार तिथेही फोफावू लागण्याची ही चिन्हे आहेत. तर मंगळवारपर्यंत ६०२ इमारती या कंटेन्मेंट झोन आहे. तर दहा दिवसांपूर्वी हा आकडा ३०५ एवढा होता. त्यामुळे इमारतींच्या कंटेन्मेंट झोनचा आकडा दुपटीने वाढलेला पाहायला मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.