गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईत मुसळधार पावसाने आता लेप्टोच्या रुग्णांत भयंकर वाढ केली आहे. दहा जुलैपर्यंत मुंबईत केवळ ५ लेप्टोचे रुग्ण होते. आता आठवडाभरात मुंबईत सहा लेप्टोचे रुग्ण आढळल्याने पालिका आरोग्य विभागाला चांगलीच धास्ती वाटत आहे. पावसाच्या पाण्यातून प्रवास केल्यास लेप्टोची लागण होत असल्याने पालिकेने प्रवासादरम्यान पावसाच्या पाण्यातून प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत जुलै महिन्यात पालिकेला ११ लॅप्टोस्पायरोसीसचे रुग्ण सापडले आहेत.
मुंबईत लॅप्टोचे रुग्ण वाढण्याची भीती
लॅप्टोस्पायरोसीस हा पाण्याशी संबंधित आजार आहे. उंदीर, डुक्कर, गाई, म्हशी, कुत्री यांना रोगाची लागण झाल्यास प्राण्यांच्या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. या प्राण्यांच्या लघवीने दूषित झालेले पाणी, माती, भाज्या यांचा माणसाशी संपर्क आल्यास लॅप्टोस्पायरोसीस हा रोग होतो. मुंबईत वाढत्या लॅप्टोच्या केसेसमध्ये उंदीर कारणीभूत असतो. पावसाच्या पाण्यात चाललेल्या रुग्णांना चाचणीअंती हमखास लॅप्टोची लागण झालेली आढळून येते. मुंबईत मागील आठवड्यात सलग तीन दिवस पावसाची संततधार होती. कित्येक भागांत शंभर मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळेला चाकरमानी मुंबईकरांच्या प्रवासादरम्यान हमखास पावसाची हजेरी दिसून यायची. त्यामुळे पावसाच्या वाढत्या हजेरीने मुंबईत लॅप्टोचे रुग्ण वाढण्याची भीती अगोदरच पालिका आरोग्य खात्याने व्यक्त केली होती. आठवडाभरात लेप्टोच्या सहा रुग्णांची नोंद झाली असली तरीही या सहा रुग्णांची ठिकाणे मात्र पालिका आरोग्य विभागाने जाहीर केलेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
(हेही वाचा जे उद्धव ठाकरेंनी सांगितले तेच आम्ही केले, शिंदे गटातील 12 खासदारांचा खळबळजनक दावा)
लॅप्टोस्पायरोसीसची लक्षणे
- तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, थंडी वाजणे, डोळे सुजणे
- मूत्रपिंड किंवा यकृत निकामी होऊन मृत्यूचीही शक्यता असते
- ब-याचदा लक्षणे किरकोळ किंवा न समजून येणारी असतात
रोगनिदान
रॅपीड डायग्सोस्टीक कीट अथवा एलायझा चाचणी द्वारे या आजाराचे निदान करता येते
उपचादरपद्धती
पेनिसिलीन, डॉक्सीसायक्लीन, टेट्रायासक्लिन, एझिथ्रोमायसीन ही औषधे रुग्णांना दिली जातात.
प्रतिबंधात्मक उपाय
- दूषित पाणी, माती किंवा भाज्यांशी मानवी संपर्क टाळणे
- अपरिहार्य परिस्थितीत रबर बूट, हात-मोजे वापरावेत.
- प्राण्यांच्या लघवीमुळे पाणीसाठे दूषित होणार नाहीत, याची काळजी घ्यावी
- परिसरातील उंदीरांचे नियंत्रण