यंदाच्या आठवड्यात तिसरी लाट येताच राज्यात दर दिवसाला कोरोना रुग्णाचा नवा विक्रम नोंदवला जात आहे. शनिवारी राज्यात ओमायक्रॉनचे १३३, तर कोरोनाचे ४१ हजार ४३४ रुग्ण सापडले. राज्यात आता १ लाख ७१ हजार २३८ सक्रिय कोरोनाचे रुग्ण आहेत. रविवारी राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांवर पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राज्यात सातत्याने मुंबईत कोरोना रुग्णांची सर्वात जास्त वाढ नोंदवली जात आहे. राज्यातील एकूण १ लाख ७१ हजार २३८ रुग्णांपैकी मुंबईतच केवळ १ लाख ६ हजार ३७ सक्रिय कोरोनाचे रुग्ण आहेत. मुंबईतच राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी ५० टक्के रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यभरातील रुग्ण बरे होण्याचा टक्का हळूहळू खालावू लागला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.३७ टक्क्यांवर नोंदवले जात आहे.
(हेही वाचा अखेर निर्बंध लागलेच! रात्री संचारबंदी! दिवसा काय असणार बंद? जाणून घ्या…)
गृह विलगीकरणावरच भर
सध्या राज्यात १ लाख ७३ हजार २३८ सक्रिय रुग्ण आहेत. मात्र सहसंपर्कातील नातेवाईकांनाही खबरदारीचा उपाय म्हणून घरी विलगीकरणावर भर दिला जात आहे. शिवाय खासगी कार्यालयांतूनही बरेच जण कोरोनाबाधित सापडत असल्याने सर्वच कर्मचा-यांना कोरोना तपासणी केली जात आहे. घरातील एकाही व्यक्तीला कोरोनाची बाधा झालेली असल्यास संपूर्ण कुटूंबाला तातडीने घरी विलगीकरणात ठेवले जात आहे. तसेच आता आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्यांना विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. सध्या राज्यातील विविध भागांत ८ लाख ४५ हजार ८९ जणांना घरी विलगीकरणात ठेवले गेले आहे, तर १ हजार ८५१ जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले गेले आहे.
- राज्यात पहिल्या लाटेपासून आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण – ६५ लाख ७५ हजार ६५६
- राज्यात पहिल्या लाटेपासून आतापर्यंत ६५ लाख ५७ हजार ८१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन गेले आहेत.